-घरभेटी देत जनगणना कामाची केली पाहणी; नोंदींची तपासणी करून व्यक्त केले समाधान
चिखली (अंकुश पाटील) : आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या एच.एल.बी. (हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग) मोजणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी चिखलीचे तहसीलदार तथा चार्ज अधिकारी विजय सवडे यांनी भरोसा गावाला अचानक भेट दिली. त्यांच्या भेटीची पूर्वकल्पना नसल्याने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
तहसीलदार सवडे यांनी सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन जनगणना कामाशी संबंधित नोंदी, कागदपत्रे तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गावातील काही घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रगणकांकडून संकलित करण्यात आलेली माहिती अचूक व योग्य पद्धतीने नोंदविण्यात आली आहे का, याची खात्री केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून जनगणनेसाठी अचूक माहिती देण्याचे महत्त्व पटवून दिले. कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय तसेच इतर आवश्यक बाबींविषयी माहिती घेऊन त्यांनी नोंदींची पडताळणी केली. त्यांच्या नम्र आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगताना तहसीलदार सवडे यांनी विविध विकास योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी ही जनगणनेतील आकडेवारीच्या आधारे केली जाते, असे स्पष्ट केले.
दरम्यान, दिनांक १५ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत झालेल्या एच.एल.बी. मोजणीअंतर्गत नोंद झालेल्या घरांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. घरातील सदस्यांकडून माहिती विचारून तपासणी केली असता जनगणनेचे काम योग्य पद्धतीने पार पडत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक अरुण लेंडे, प्रगणक थुटटे सर, उबरहंडे मॅडम, करवंदे मॅडम तसेच इतर प्रगणक उपस्थित होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी जनगणनेचे काम नियोजनबद्ध आणि अचूकरीत्या पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदारांना दिली. तहसीलदार विजय सवडे यांच्या या अचानक भेटीमुळे गावकऱ्यांमध्ये जनगणनेबाबत जागरूकता वाढली असून, शासकीय कामकाजाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

