–ऑनलाइनच्या अफवांना पूर्णविराम; शाळा नेहमीप्रमाणे ऑफलाइनच सुरू होणार
-तीव्र उन्हाळ्यामुळे विदर्भातील शाळांच्या वेळेत बदल; अन्य बोर्डांना स्वायत्तता
पुणे (सोनाली बडगुजर) : आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दरवाढ आणि वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा उशिरा किंवा ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आगामी शैक्षणिक वर्ष कोणत्याही बदलांशिवाय १५ जूनपासूनच ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि पालकांमध्ये शाळांच्या वेळापत्रकाबाबत विविध चर्चा सुरू होत्या. वाढत्या तापमानामुळे शाळा प्रत्यक्ष सुरू न करता ऑनलाइन वर्ग घेतले जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शिक्षण विभागाने या सर्व अफवा आणि तर्कवितर्क फेटाळून लावत शाळा नियोजित वेळेनुसार सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य मंडळाशी (SSC) संलग्न प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली होती. राज्यभरातील शाळांच्या सुटीच्या कालावधीत सुसंगती राखण्यासाठी शिक्षण विभागाने यापूर्वीच आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनलाच होणार आहे.दरम्यान, विदर्भातील जून महिन्यातील तीव्र उष्णता लक्षात घेऊन शिक्षण विभागाने तेथील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल केला आहे. १५ ते २९ जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत चालतील. त्यानंतर ३० जूनपासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील. तसेच राज्यातील इतर शिक्षण मंडळांशी संलग्न असलेल्या CBSE, ICSE आणि इतर बोर्डांच्या शाळांना त्यांच्या शैक्षणिक नियोजनानुसार वेळापत्रक ठरविण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार सुटी अथवा वेळेत बदल करण्याचा निर्णय संबंधित शाळा प्रशासन घेऊ शकणार आहे.
शिक्षण विभागाच्या या स्पष्टीकरणामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संभ्रम दूर झाला असून, यंदाचा शाळा प्रवेशोत्सव नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

