पावसाने डोळे वटारले; मृग नक्षत्रातही तळपते ऊन, पेरण्या लांबल्या

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-कृषी सेवा केंद्रांत शुकशुकाट; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रात तरी पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तळपत्या उन्हामुळे घामाच्या धारा वाहत असून, संभाव्य कोरड्या दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे.

मागील वर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मे महिन्यात तब्बल २५० मिमी पावसाची नोंद झाली होती. नदी-नाले खळखळून वाहत होते. कपाशीची लागवड मे महिन्यातच जवळपास पूर्ण झाली होती, तर सोयाबीन पेरणीची तयारी सुरू झाली होती. मूग, उडीद, मका व ज्वारीची पेरणी १० जूननंतर सुरू झाली होती. शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी व कल्टिव्हेटरद्वारे शेतीची मशागत पूर्ण करून ठेवली होती. यावर्षी मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. शेतांमध्ये अजूनही नांगरणीची मोठी ढेकळे कायम आहेत. ती जिरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्यानंतरच पुढील मशागत करून पेरणीयोग्य स्थिती निर्माण होऊ शकते. मे महिना पूर्णपणे कोरडा गेला असून जून महिन्याची ९ तारीख उजाडली तरी पावसाचा मागमूस नाही. अनेक हवामान तज्ज्ञांनी १ जूनपासून विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच ७ जूनपर्यंत सर्वत्र पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला होता. मात्र, रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रातही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतकरी चातक पक्षाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून बसला आहे, मात्र आकाशात ढगही दिसत नसल्याने निराशा वाढत आहे. पावसाअभावी बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांकडे फिरकत नसल्याने तेथेही शुकशुकाट दिसून येत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून त्यामध्ये सोयाबीन ३५ हजार हेक्टर, कपाशी २० हजार हेक्टर, मूग ५०० हेक्टर, उडीद ५०० हेक्टर आणि ज्वारी ५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

यावर्षी हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा विशेष कल दिसून येत आहे. साखरखेर्डा, गुंज, वरोडी, सावंगी भगत, उमनगाव, पांगरीकाटे, बाळसमुद्र, पिंपळगाव सोनारा, शिंदी, मोहाडी, सवडद, राताळी व दरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करण्यात आली आहे. अंदाजे २ हजार हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड होणार असून अनेक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून लागवडही पूर्ण केली आहे. मात्र, विहिरींची पाणीपातळी खालावल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. मोटारपंप सुरू केल्यानंतर काही मिनिटांतच वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी पंपांसाठी अखंडित व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मोहाडी येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप आण्णा काळे तसेच गुंज येथील हळद उत्पादक गुलाबराव तुपकर यांनी केली आहे. दरम्यान, जांभोरा, चांगेफळ, वर्दडी आणि सोनोशी परिसरात काही शेतकऱ्यांनी कपाशीची धूळपेरणी केली असून आता त्यांच्या नजरा देखील पावसाकडे लागल्या आहेत.

Share This Article
Exit mobile version