ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रावण सांगता

editor 1 Min Read
1 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वडमुखवाडी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रावणमासानिमित्त श्री हरिविजय कथासार या ग्रंथाचे वाचन हरिभक्त परायण साहेबराव शेळके महाराज यांनी केले. सांगता समारंभा निमित्त हरिभक्त परायण चैतन्य महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होऊन हरिनाम गजरात श्रावण मास सांगता झाली. ग्रंथाचे पूजन थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते करण्यात आले. मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रावण महिन्यानिमित्त श्री हरिविजय कथासार ग्रंथाचे वाचन करण्यात आले. या वाचनाचे नेतृत्व ह.भ.प. साहेबराव शेळके महाराज यांनी केले. विविध धार्मिक कार्यक्रमात पहाटे काकडा, आरती , दुपारी भजन, नित्य नेमाने हरिपाठ, हरिविजय ग्रंथाचे वाचन व संध्याकाळी श्रींची माऊलींची आणि श्री पांडुरंगरायांची आरती नंतर भाविकांना श्रींचे दर्शन व्यवस्था करण्यात आली होती.

प्रथापरंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम श्रावणमासा निमित्त महिना भर हरिनाम गजरात झाले. यावेळी ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देऊन कीर्तनकार व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिंडी मिरवणूक हरिनाम गजरात झाली. भाविक भक्त नागरिकांना याप्रसंगी अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी खजिनदार दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब तापकीर, ह.भ.प. सोमनाथ महाराज भालेराव, ह.भ.प. रमेश महाराज घोंगडे, राजेंद्र नाणेकर, नाना ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version