-महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी विविध मोफत वैद्यकीय सुविधांची घोषणा
निंबळक (बाळासाहेब खेडकर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच जागतिक मासिक पाळी स्वच्छता सप्ताहानिमित्त निंबळक येथे विशेष महिला आरोग्य जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले. “महिलांचे आरोग्य चांगले तर कुटुंबाचे आरोग्य चांगले” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास महिला व किशोरी मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी आरोग्यविषयक समस्या असलेल्या महिलांसाठी मोफत ओपीडी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी गर्भवती मातांची मोफत तपासणी, सर्व रुग्णांची मोफत शुगर तपासणी आणि मोफत ईसीजी तपासणी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमास कृष्णाली व कृष्णप्रीत वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, सचिव प्रियांका शेळके (बोबडे), सामाजिक कार्यकर्ते हर्षल आगळे, डॉ. अमित पवार, डॉ. सुमित आबेकर, डॉ. सतीश गेरंगे तसेच ग्रामसेवक रासकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनी, किशोरी मुली तसेच स्वयंसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले.

