-लंडनहून निघालेली ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’ पंढरपूरच्या वाटेवर; ११ देशांतून ५० दिवसांचा आध्यात्मिक प्रवास
-भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते शुभारंभ
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी रुजविलेल्या वारकरी संप्रदायाचा महिमा आता सातासमुद्रापार पोहोचला असून, ‘ज्ञानबा-तुकाराम’चा जयघोष इंग्लंडच्या भूमीवर दुमदुमला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि विठ्ठल भक्तीचे प्रतीक असलेली आषाढी वारी यंदा जागतिक स्वरूपात साकारली असून, लंडनहून सुरू झालेली ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’ सध्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. वारकरी परंपरा, संत विचार आणि भारतीय संस्कृतीचा संदेश जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
११ देशांचा प्रवास; आषाढी एकादशीला पंढरपूरात सांगता
ही जागतिक वारी युनायटेड किंगडम, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, पोलंड, हंगेरी, तुर्की, जॉर्जिया आणि भारत अशा ११ देशांतून प्रवास करणार आहे. सुमारे ५० दिवसांचा हा आध्यात्मिक प्रवास पूर्ण करून दिंडी आषाढी एकादशीच्या निमित्ताने २५ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. प्रवासादरम्यान विविध शहरांमध्ये कीर्तन, अभंग गायन, सांस्कृतिक कार्यक्रम, संत साहित्याचे वाचन तसेच भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेची माहिती देणारे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही वारी केवळ धार्मिक न राहता सांस्कृतिक देवाणघेवाणीचेही प्रभावी माध्यम ठरणार आहे.
चिंचपूर इजदेच्या सुपुत्राची जागतिक संकल्पना
या अभिनव उपक्रमामागे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे गावचे सुपुत्र डॉ. अनिल एकनाथ खेडकर यांची दूरदृष्टी आणि प्रेरणा आहे. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००८ मध्ये ते लंडनमध्ये स्थायिक झाले. वैद्यकीय आणि औषधनिर्माण क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांनी वारकरी संप्रदायाशी असलेले आपले नाते अखंड जपले आहे. पीएच.डी. (क्लिनिकल रिसर्च), मास्टर इन फार्मास्युटिकल सायन्सेस आणि बॅचलर ऑफ फार्मसी अशी उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या डॉ. खेडकर यांना औषधनिर्माण नियामक व्यवहार क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. २०२३ मध्ये त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन’ची स्थापना करून शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.
पंढरपूर ते लंडन पादुका यात्रेतून जन्मली ‘ग्लोबल वारी’
गतवर्षी डॉ. खेडकर यांनी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुका घेऊन २२ देशांमधून तब्बल १८ हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. सुमारे ७० दिवस चाललेल्या या ऐतिहासिक यात्रेत त्यांनी विविध देशांमध्ये विठ्ठल भक्तीचा संदेश पोहोचविला. या उपक्रमाला भारतीय समाजासह परदेशातील नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातूनच ‘ग्लोबल वारी’ची संकल्पना साकार झाली.
लंडनमध्ये उभारणार पहिले भव्य विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
भारताबाहेर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य आणि सर्वसमावेशक मंदिर उभारण्याचा संकल्पही डॉ. खेडकर यांनी केला आहे. युनायटेड किंगडममध्ये उभारण्यात येणारे हे मंदिर परदेशातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख आध्यात्मिक केंद्र ठरणार असून, संत परंपरा आणि भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी जनजागृती करणे, जगभरातील वारकरी भक्तांना एकत्र आणणे आणि नव्या पिढीपर्यंत संतांचा विचार पोहोचविणे हा ‘ग्लोबल वारी’चा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ढोल-ताशाच्या गजराची जागतिक नोंद
भारतीय सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी डॉ. खेडकर यांनी ढोल-ताशा परंपरेलाही जागतिक व्यासपीठ मिळवून दिले आहे. परदेशात एकाच वेळी २५० वादकांनी एकत्रितपणे ढोलवादन करून विक्रमी नोंद प्रस्थापित केली असून, या उपक्रमाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
पुरस्कारांनी गौरवलेले व्यक्तिमत्त्व
सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अनिल खेडकर यांना ‘40 Under 40 UK Business Professional Award’, ‘शिवप्रतिष्ठान प्रवर्तक पुरस्कार’, ‘अखंड भारत परिषद ग्लोबल वारकरी पुरस्कार’ यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
‘पंढरीची वारी जगाच्या दारी’ संकल्पना प्रत्यक्षात
शेकडो वर्षांची वारकरी परंपरा आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जागतिक स्तरावर पोहोचत असल्याचे चित्र या उपक्रमातून स्पष्ट होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा युरोपच्या भूमीवरून पंढरपूरकडे प्रवास करत असून, ‘पंढरीची वारी जगाच्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याची भावना वारकरी भक्त व्यक्त करीत आहेत. विठ्ठल भक्ती, संत विचार आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारी ही ‘ग्लोबल वारी’ वारकरी संप्रदायाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली जाणार आहे.
चौकट
“यूकेमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील बांधवांना एकत्र आणून भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि महाराष्ट्राची ओळख परदेशात जपण्याचे व ती अधिक व्यापक करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. अनिल खेडकर यांच्या प्रयत्नांतून होत आहे. तरुणांनी एकत्र येऊन संस्कृती संवर्धनाची ही चळवळ पुढे नेणे अत्यंत अभिमानास्पद आहे. अशा उपक्रमांना सर्वांनी सहकार्य व पाठबळ देणे ही काळाची गरज आहे.”
— डॉ. नामदेव शास्त्री महाराज, भगवानगड

