मेहकर आगाराला ५० बसेस देणार; राज्यातील बसस्थानकांचा पीपीपी तत्त्वावर विकास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-मेहकर येथील नवीन बसस्थानकाचे थाटात लोकार्पण; प्रवासी सोयीसुविधांवर भर

बुलढाणा/मेहकर (बाळू वानखेडे) : प्रवासी हे एसटीचे दैवत असून त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, हे शासनाचे कर्तव्य आहे. मेहकर आगार जिल्ह्यात सर्वात मोठे असून नफ्यातही अग्रस्थानी असल्याचे सांगत, मात्र बसेसची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी मान्य केले. या पार्श्वभूमीवर मेहकर आगाराला लवकरच ५० नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

मेहकर येथे ८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन बसस्थानकाचे उद्घाटन ७ जून रोजी मंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव होते. यावेळी आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, नगराध्यक्ष किशोर गारोळे, प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे, कार्यकारी अभियंता राहुल मोडक, विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार निलेश मडके, आगार प्रमुख हर्षल साबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बसेसची वाढ आणि पीपीपी मॉडेलचा विकास

परिवहन मंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की, राज्यातील बसस्थानकांचा विकास पीपीपी (Public Private Partnership) तत्त्वावर करण्यात येणार असून प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मेहकर आगाराच्या वाढीव जागेसाठी १४ कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही जुने बांधकाम खर्चीक डागडुजीपेक्षा नव्याने उभारले असते, तर भविष्यातील गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्या असत्या, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. स्थानिक मागण्या व प्रवाशांच्या अडचणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या मार्गावर समृद्धी महामार्गावर बससेवा सुरू करण्याची सूचना केली. मेहकर आगारावर मेहकरसह लोणार, सिंदखेडराजा आदी तालुक्यांची जबाबदारी असल्याने जादा बसेसची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर आगाराची २०१८ मधील १०२ बसेसची संख्या आता ८१ वर आल्याचे सांगत प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये बससेवा अपुरी असल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नसल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी देखील विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी केले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी , कार्यकर्ते, प्रवासी तसेच एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version