राखीव जंगल नष्ट होत असल्याने वानरसेना गावात;

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-दोन वानर जखमी, प्राणीमित्रांकडून जीवदान

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : राखीव जंगलक्षेत्र घटत चालल्यामुळे जंगली प्राणी आता गावाच्या दिशेने वळत असल्याचे चित्र साखरखेर्डा परिसरात दिसून येत आहे. अन्न व पाण्याच्या शोधात वानरसेना गावात दाखल होत असून, याच महिन्यात दोन वानर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक प्राणीप्रेमी व पक्षीमित्रांच्या मदतीने या वानरांचे प्राण वाचविण्यात आले आहेत.

वानर आणि मानव यांचे नाते जुने असल्याने वानरे सहजपणे मानवी वस्तीच्या जवळ येतात. साखरखेर्डा येथील कै. भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाजवळ ६ जून रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक वानर गंभीर जखमी झाले. जखमी वानराला पाहून परिसरात मोकाट कुत्र्यांचा कळप जमा झाला होता. ही बाब रामभाऊ मंडळकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून कुत्र्यांना हुसकावून लावले आणि वानराचे प्राण वाचवले. यानंतर प्राणी व पक्षीमित्र गजानन इंगळे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवन बेंदाडे यांच्या मदतीने जखमी वानरावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर वानराला सुरक्षित स्थळी रामभाऊ मंडळकर यांच्या घरी ठेवण्यात आले आणि वन विभागाशी संपर्क साधण्यात आला.

वन विभागाच्या मेहकर येथील पथकाने आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन पुढील उपचारासाठी वानर ताब्यात घेतले. याआधीही याच परिसरात आणखी एक जखमी वानर आढळून आले होते, जे वन विभागाच्या मदतीने उपचारासाठी नेण्यात आले होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. जंगलक्षेत्र कमी होत असल्याने अन्न-पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी वन्यजीवांप्रती सहानुभूती व जबाबदारीची भूमिका घ्यावी, असे आवाहन प्राणीप्रेमींनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version