-कुटुंब स्मशानजोगी व्यवसायासाठी वास्तव्यास; पोलिसांकडून मर्ग दाखल
साखरखेर्डा (वार्ताहर) : येथील श्री रोकडोबा हनुमान मंदिरामागील हिंदू स्मशानभूमीत वास्तव्यास असलेल्या एका ३४ वर्षीय महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्या केल्याची घटना ६ जून रोजी दुपारी घडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहावर आज सकाळी त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत महिलेचे नाव सौ. शारदा प्रकाश धनसरवाड (वय ३४) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश रमेश धनसरवाड (रा. धानकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) हे कुटुंब स्मशानजोगी व्यवसायासाठी या भागात वास्तव्यास होते. स्मशानभूमीची स्वच्छता व वृक्षसंवर्धन करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने त्यांना येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक नागरिकांकडून त्यांना मदतही केली जात होती. गेल्या काही महिन्यांत या कुटुंबाची गावात ओळख निर्माण झाली होती. लोकवर्गणीतून त्यांच्यासाठी एक लहान निवासस्थानही उभारण्यात आले होते.
घटनेच्या दिवशी दुपारी घरात कोणी नसताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे. कुटुंबातील सदस्य बाहेर गेले असताना महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेनंतर तिला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (मर्ग) दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मेंधने करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

