‘सिजेंटा’ कंपनीचे टोमॅटो बियाणे निघाले वांझोटे अन भेसळही!

editor 4 Min Read
4 Min Read

– तातडीने नुकसान भरपाई देण्याची नुकसानग्रस्त शेतकर्‍याची मागणी
– दीड-दोन लाखांचा खर्च करूनही टोमॅटो वाणाला फळेच लागली नाहीत!

चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यातील तेल्हारा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील शेतकरी मोतिराम कुटे व रमेश कुटे यांनी सिजेंटा कंपनीच्या टोमॅटो वाणाची लागवड केली होती. त्यावर प्रत्येकी दीड ते दोन लाखांचा खर्चही केला. परंतु, या वाणाला फळेच लागली नाहीत. त्यामुळे हे वाण वांझोटे निघाले असून, बियाण्यांतील भेसळही उघडकीस आली आहे. शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी टोमॅटो शेतीची पाहणी करून पंचनामा केला आहे. या शेतकर्‍यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असून, कंपनीवर कार्यवाही करावी, अशी मागणीही कृषी अधिकार्‍यांकडे केली आहे.

तेल्हारा येथील शेतकर्‍यांनी सिजेंटा कंपनीच्या टोमॅटो रोपांची लागवड शेतामध्ये केली होती. परंतु दरवर्षी प्रमाणे झाडांना फळधारणा होत नसल्याचे दिसून आल्याने फसवणूक झाल्याची बाब शेतकरी मोतिराम कुटे व रमेश कुटे यांनी कृषी विभागाकडे केली आहे. तसेच, तात्काळ पंचनामा करुण नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, कृषी विद्यापीठ सलग्न असलेल्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषी अधिकारी यांनी शेताची पाहणी केली असून, नुकसानीचा पंचनामादेखील करण्यात आला आहे. शेतकरी मोतिराम भगवान कुटे हे दरवर्षी शेतामध्ये भाजीपाला लागवड करतात तर त्यांनी यावर्षी चव्हाण रोपवाटिका येथून सिजेंटा कंपनी २०४८ वाणाचे रोपे घेत टोमॅटो पिकाची लागवड एक एकर शेतामध्ये केली होती. शेतीमशागत, लागवडीसाठी मोठा खर्च त्यांनी केला. लागवडी नंतर झाडांना रासायनिक खते, कीटकनाशके, औषध फवारणी नंतरसुद्धा फळधारणा कमी प्रमाणात असल्याचे दिसून आल्याने याबाबत शेतकर्‍यांनी कंपनी प्रतिनिधी व रोपवाटिकेस कळविले. परंतु वातावरण बदलामुळे असे होऊ शकते, असे म्हणत, औषध फवारणी करण्याचा सल्ला दिल्याने या प्रतिनिधीने दिला. त्यानुसार, शेतात फवारणीसुद्धा केली. परंतु दरवर्षीच्या तुलनेत लागवडीस अडीच महिने उलटूनही टोमॅटोला फळधारणा होतांना दिसत नसल्याने व केलेली मेहनत व खर्च वाया जातांना दिसत असल्याने सिजेंटा कंपनीकडून टोमॅटो रोपात फसवणुक झाल्याची तक्रार या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी विभागाकडे केली व तात्काळ शेताची पाहणी व पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

या तक्रारीची तातडीने दखल घेत दि. २४/०८/२०२२ रोजी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. एस. तारू, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, कृषी अधिकारी संदीप सोनुने यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतकर्‍यांसह टोमॅटो पिकाची पाहणी केली. अधिकार्‍यांकडून रॅडम पध्दतीने झाडांच्या फळांची संख्या घेत, पंचनामादेखील करण्यात आला. यामध्ये झाडांना ७० ते ८० टक्के फळधारणा कमी असल्याचे व प्रत्यक्ष पाहणीमध्ये झाडांमधे २० ते ३०टक्के एवढी भेसळ असल्याचे समोर आले आहे. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, कृषी मंडळ अधिकारी डी. बी. गवते, कृषी सहाय्यक सौ वाकोडे, कंपनी प्रतिनिधी संजय सोळंकी, मोतीराम कुटे, रमेश कुटे, गजानन कुटे, गुलाबराव कुटे, एकनाथ कुटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


कंपनी प्रतिनिधीने दिला झाडे उपटून फेकण्याचा उलटा सल्ला!
शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर कंपनीचे प्रतिनिधी यांनी रोपवाटिका मालकांच्या सांगण्यावरून शेताची पाहणी केला,r तर झाडांना फळधारणा कमी असल्याचे दिसून आले. यावर शेतकर्‍यांनी उपाय विचारला असता, पंचनामा होण्यापूर्वीच झाडे उपटून फेका, असा उलटा सल्ला या प्रतिनिधीने शेतकर्‍यांना दिला होता. म्हणजे, पुरावे नष्ट करण्याचे काम हा प्रतिनिधी करत होता, असे दिसून येत आहे.

 

Share This Article
Exit mobile version