-मोहाडी येथील पाणीपुरवठा योजनेचा ट्रान्सफॉर्मर कधी सुरू होणार?
-सहा महिन्यांपासून रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : मोहाडी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर अपूर्ण कामामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असून, त्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. संबंधित ट्रान्सफॉर्मर तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
सरपंच बबनराव काळे आणि विलास आबा रिंढे यांनी साखरखेर्डा येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता रोहित पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याची मागणी केली आहे. गावातील विद्यमान ट्रान्सफॉर्मरवर विजेचा वापर वाढल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्याचा थेट परिणाम गावातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. ही बाब ग्रामस्थांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मागील वर्षी पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभारण्यास निधी मंजूर करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी खामगाव येथील ठेकेदाराने या ट्रान्सफॉर्मरचे काम हाती घेतले होते. त्यानंतर हे काम बीबी येथील पवन चव्हाण या ठेकेदाराकडे सोपविण्यात आले. संबंधित ठेकेदाराने ट्रान्सफॉर्मर उभारून वीजवाहक तारा ट्रान्सफॉर्मरपर्यंत जोडल्या आहेत.
मात्र, ट्रान्सफॉर्मरची तपासणी करून तो सुरू करण्याची जबाबदारी महावितरणची असताना अद्याप पुढील जोडणी करण्यात आलेली नाही. परिणामी, वीजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. याबाबत अनेक वेळा महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आजही ट्रान्सफॉर्मर सुरू न होता तसाच उभा आहे. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजनेवर विपरीत परिणाम होत असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ट्रान्सफॉर्मर अद्याप सुरू का करण्यात आलेला नाही, याचा खुलासा करावा आणि तातडीने तो कार्यान्वित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

