-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण जनजागृतीलाही प्राधान्य देण्यात आले. यानिमित्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तीन पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये ‘पृथ्वी आपली, जबाबदारीही आपली!’, ‘बिन इट राईट!’ आणि ‘गिरिमित्र’ या लघुपटांचा समावेश होता. निसर्ग संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत जीवनशैली यांविषयी प्रभावी संदेश या चित्रफितींमधून देण्यात आला.
‘पर्यावरण संवर्धन ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. हरित परिसर निर्मितीसाठी आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे,’ असे मत प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर यांनी व्यक्त केले. भविष्यातही पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

