जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-घनदाट नागरी वन निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्रारंभ; पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार

पुणे (अर्जुन मेदनकर) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारागृह विभाग आणि रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड करून घनदाट नागरी वन (Dense Urban Forest) निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमास आज प्रारंभ करण्यात आला.

यावेळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा कारागृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. सुहास वारके (आयपीएस), म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या मानव संसाधन विभागाचे संचालक नंदकिशोर नाईक, रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे अध्यक्ष रोटेरियन देवदत्त हंबर्डीकर व सभासद, येरवडा कारागृह प्रशासनाचे अधिकारी शामकांत शेडगे तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे पर्यावरण संचालक राजेंद्रकुमार सराफ आदी मान्यवर उपस्थित होते. वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येरवडा खुल्या कारागृहाच्या परिसरातील एक एकर जागेवर हे घनदाट नागरी वन विकसित करण्यात येणार असून, या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

घनदाट नागरी वनांची संकल्पना

घनदाट जंगले म्हणजे अशी ठिकाणे, जिथे झाडे एकमेकांच्या अत्यंत जवळ असतात. त्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीपर्यंत पोहोचणे कठीण होते. ही जंगले पृथ्वीची फुफ्फुसे मानली जातात. अशा ठिकाणी विविध दुर्मिळ वनस्पती तसेच अनेक प्रकारचे वन्यजीव वास्तव्य करतात.

शहरी घनदाट जंगले ही शहराची फुफ्फुसे मानली जातात. घनदाट नागरी वनांमुळे जैवविविधतेचे संवर्धन, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, कार्बन शोषण क्षमतेत वाढ आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मोठी मदत होणार आहे. केवळ वृक्षलागवड करून थांबणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, लागवड करण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाने स्वीकारली आहे. भविष्यात हा परिसर समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित होईल. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून, या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे.

Share This Article
Exit mobile version