चिखली : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read
  • पळसखेड जयंती फाट्याजवळ अपघात; कारचालकावर गुन्हा दाखल

चिखली (अंकुश पाटील): चिखली शहरानजीक असलेल्या पळसखेड जयंती फाट्याजवळ १ जून रोजी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील वॅगनार कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सोबती गंभीर जखमी झाला आहे. अक्षय रमेश कुळसुंदर (वय ३५, रा. चिखली) असे अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर वैभव सोपान गवारे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुळसुंदर आणि वैभव गवारे हे दोघे १ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीने चिखली ते बुलढाणा मार्गाने जात होते. दरम्यान, पळसखेड जयंती फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव वॅगनार कारने (क्रमांक एमएच-४९-बीबी-६३४६) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने दोन्ही जखमींना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अक्षय कुळसुंदर याचा मृत्यू झाला होता. तर वैभव गवारेची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी भालगाव येथील रहिवासी ॲड. शंकर चव्हाण यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी वॅगनार कारचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६ (१), १२५ (बी) आणि २८१ नुसार निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकला मस्के करत आहेत.

Share This Article
Exit mobile version