कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरसाठी ‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाचा नवा उपक्रम

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिक्षण तसेच डेटा विज्ञान अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू; उद्योगाभिमुख शिक्षणावर भर

पुणे (अर्जुन मेदनकर) : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाने ‘स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एसओएआय) स्थापनेची घोषणा केली आहे. उद्योग आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे नैतिक, सर्जनशील आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या नव्या स्कूलअंतर्गत बी.टेक (कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र शिक्षण) आणि बी.टेक (कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा विज्ञान) हे चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या भक्कम पायावर आधारित या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध अत्याधुनिक शाखांमध्ये प्राविण्य मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. डीप लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, जनरेटिव्ह एआय, डेटा अॅनालिटिक्स आणि इंटेलिजंट सिस्टिम्स डिझाईन यांसारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. एमआयटी-एडीटी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी आणि अधिष्ठाता डॉ. गणेश पाठक यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी बोलताना प्रा. डॉ. राजेश एस. यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता-केंद्रित शिक्षण पद्धती हे या स्कूलचे प्रमुख वैशिष्ट्य असेल. विद्यार्थ्यांना पहिल्याच सत्रापासून उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्यांवर आधारित प्रकल्प, वास्तववादी डेटासेट्स आणि आधुनिक एआय साधनांसह काम करण्याची संधी मिळणार आहे. ‘एआय प्रॅक्टिस स्कूल’ मॉडेलअंतर्गत उद्योगांमध्ये दीर्घकालीन इमर्शन कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष एआय प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभवही दिला जाणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (एनईपी २०२०) शी सुसंगत असा हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून हेल्थकेअर, फिनटेक, अ‍ॅग्रीटेक, जनरेटिव्ह एआय आणि एजेंटिक एआय यांसारख्या क्षेत्रांमध्ये विशेष अभ्यासाची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय क्लाउड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि ह्युमन-कॉम्प्युटर इंटरॅक्शन यांसारख्या बहुआयामी विषयांचा समावेश करून विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम बनविण्यावर भर देण्यात आला आहे. उद्योग क्षेत्राशी मजबूत संबंध हे या स्कूलचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. अग्रगण्य तंत्रज्ञान कंपन्यांसोबत भागीदारी करून उद्योगतज्ज्ञांकडून सहशिक्षण, AWS Academy, Coursera आणि edX यांसारख्या जागतिक प्लॅटफॉर्म्सच्या सहकार्याने संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच उद्योग-प्रायोजित कॅपस्टोन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक मार्गदर्शकासोबत उद्योग मार्गदर्शकाचीही साथ मिळणार असून शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या अत्याधुनिक कॅम्पसमध्ये हे स्कूल कार्यरत राहणार आहे. सुमारे १५ लाख चौरस फूट परिसरात अत्याधुनिक एआय प्रयोगशाळा, आयसीटी-सक्षम स्मार्ट क्लासरूम्स, GPU आणि TPU आधारित संगणकीय सुविधा तसेच संशोधन आणि इनक्युबेशनसाठी विशेष केंद्रे उपलब्ध असतील.

जबाबदारीने नेतृत्व करणारे विद्यार्थी घडविण्यावर भर

प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नैतिकता आणि समाजोपयोगी संशोधनाला या स्कूलमध्ये विशेष महत्त्व दिले जाणार आहे. स्पष्टीकरणक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय गव्हर्नन्स, निष्पक्षता-जागरूक मॉडेलिंग आणि डेटा गोपनीयता यांसारखे विषय अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असतील. केवळ सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करणारे नव्हे, तर त्यांच्या सामाजिक परिणामांची जाणीव ठेवून जबाबदारीने नेतृत्व करणारे विद्यार्थी घडविण्याचा विद्यापीठाचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले की, ‘स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही पुढील पिढीतील तांत्रिकदृष्ट्या सक्षम, नैतिक मूल्यांनी समृद्ध आणि मानवी संवेदनशीलता जपणारे कृत्रिम बुद्धिमत्ता नेतृत्व घडविण्याची विद्यापीठाची बांधिलकी आहे. नवोपक्रम आणि जबाबदारी यांचा संगम साधणारी शिक्षणव्यवस्था उभी करून देश आणि जगासाठी सकारात्मक बदल घडविणारे विद्यार्थी घडविण्याचा आमचा प्रयत्न राहील.

Share This Article
Exit mobile version