-ढाकणे शैक्षणिक संकुलाच्या रोजगार मेळाव्यात २२८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
बोधेगाव प्रतिनिधी (शेवगाव) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या मेगा ओपन कॅम्पस ड्राइव्ह २०२६ ला ढाकणे शैक्षणिक संकुल, शेवगाव येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आयटीआय आणि अभियांत्रिकी शाखेतील एकूण २२८ विद्यार्थ्यांची विविध नामांकित उद्योग समूहांमध्ये निवड झाल्याने विद्यार्थी, पालक आणि संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान, संगमनेर संचलित ढाकणे शैक्षणिक संकुल अंतर्गत समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक), सुनिताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तसेच समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने या मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. एकनाथराव ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोजगार मेळाव्यात विविध प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या मुलाखती आणि निवड प्रक्रिया पार पाडली. यामध्ये आयटीआय विभागातील १११ तर अभियांत्रिकी विभागातील ११७ विद्यार्थ्यांची निवड झाली. अशा प्रकारे एकूण २२८ विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली. विद्यार्थ्यांची निवड व्हिजन इंडिया प्रा. लि., क्रोमियम इंजिनिअरिंग पुणे, आरएसबी ट्रान्समिशन पुणे, राधे मशिनरी प्रा. लि., कल्याणी टूल प्रा. लि., मेडिया इंडिया प्रा. लि., एलटीएच आयटी सोल्युशन्स अहिल्यानगर, जॉन डिअर तसेच प्रतिष्ठान प्रा. लि. पैठण यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक २.१० लाख ते ३.२५ लाख रुपयांपर्यंतचे आकर्षक वेतन पॅकेज मिळणार आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या ध्येयाला या उपक्रमामुळे मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. रोजगाराच्या संधी थेट विद्यार्थ्यांच्या दारात आणण्याचा संस्थेचा प्रयत्न यशस्वी ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. एकनाथराव ढाकणे, उपाध्यक्ष श्रीकांत ढाकणे, कोषाध्यक्ष हृषीकेश ढाकणे, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि पालकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या मेगा ओपन कॅम्पस ड्राइव्हच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड, प्रा. अंबादास डोंगरे, प्रा. रियाझखान अत्तार, प्रा. प्रवीण नागरगोजे, समर्थ आयटीआयचे प्राचार्य संतोष आंधळे, निदेशक सुमित वायाळ आणि निदेशक बोडखे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

