– मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर अंतिम शिक्कामोर्तब; २ लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) : राज्यातील संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी अखेर राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. बहुप्रतीक्षित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’चे निकष अंतिम झाले असून, या माध्यमातून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीत या ऐतिहासिक निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, ब्रेकिंग महाराष्ट्रने या संदर्भात सविस्तर वृत्त यापूर्वीच प्रकाशित केले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे.
गेल्या काही वर्षांत राज्याला अतिवृष्टी, महापूर, तीव्र दुष्काळ आणि सततचा पाऊस अशा एकापाठोपाठ एक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. त्यातच शेतमालाला बाजारात अपेक्षित हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे, राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत असल्याने शेतकऱ्यांना उसाची एकरकमी ‘एफआरपी’ (FRP) मिळण्यातही अडचणी येत आहेत. या आर्थिक कोंडीमुळे राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या होत असल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. याच पार्श्वभूमीवर, संकटाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे थकबाकीदार पात्र
सहकार विभागाने राज्यातील राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, खासगी आणि ग्रामीण बँकांकडून थकबाकीदार तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती गोळा करून ती सरकारला सादर केली आहे. कर्जमाफीचे निकष पूर्वीच्या योजनांप्रमाणेच असणार आहेत. या योजनेचा लाभ ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. ३१ मे ते ३० जून या कालावधीत बहुतांश शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी जुने पीककर्ज भरावे लागते आणि नवीन कर्जाची उचल करावी लागते. शेतकऱ्यांची हीच गरज लक्षात घेऊन, त्यांच्या मुदतीपूर्वी म्हणजेच ३० जूनच्या आत कर्जमाफीचा लाभ थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. जेणेकरून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळणे सुलभ होईल.
कर्जमाफीचे गणित : एका नजरेत
| तपशील | आकडेवारी / माहिती |
| योजनेचे नाव | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना |
| एकूण लाभार्थी शेतकरी | सुमारे ५६ लाख (थकबाकीदार व नियमित) |
| एकूण मंजूर निधी | ३६,००० कोटी रुपये |
| कर्जमाफीची मर्यादा | २ लाख रुपयांपर्यंत |
| पात्रतेची अंतिम तारीख | ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीची थकबाकी |
| रक्कम जमा होण्याची मुदत | ३० जूनपूर्वी |
“महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.”
— सहकार विभागातील उच्चपदस्थ सूत्रे
‘देवाभाऊ’ शेतकऱ्यांचे पांग फेडणार; ३५ लाख शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी!

