दिल्लीतील ‘वाढती जवळीक’ डोळ्यात खुपली?; फडणवीसांची ‘शांत रणनीती’ आणि विखे कोंडीत?
अहिल्यानगर (बाळासाहेब खेडकर) – अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणात सध्या पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू असून, एकेकाळी जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या विखे परिवाराला आता स्वतःच्याच पक्षात अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील सत्तेचा आणि राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या विखे परिवाराविरोधात आता पक्षातीलच काही अंतर्गत शक्ती एकवटत असल्याने, आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आज अखेर प्राजक्त तनपुरे यांनी मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्यासह आदी नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसल्याची राजकीय चर्चा आहे. पण, त्यात तथ्य नसल्याचेही वास्तव आहे. विशेष म्हणजे, या सर्व घडामोडींसंदर्भात ब्रेकिंग महाराष्ट्रने सविस्तर वृत्तही यापूर्वीच प्रसिद्ध केले होते. (https://breakingmaharashtra.in/?p=44669)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय शैली उघड संघर्ष करण्यापेक्षा अत्यंत शांतपणे आणि पडद्यामागून प्रतिस्पर्ध्याला कोंडीत पकडण्याची मानली जाते. याच शैलीचा वापर करून विखेंना थेट लक्ष्य न करता, त्यांच्या जिल्ह्यातील एकहाती राजकीय प्रभावाला मर्यादा आणण्याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या रणनीतीचा भाग म्हणून विखेविरोधी स्थानिक नेत्यांना अप्रत्यक्षपणे बळ दिले जात असल्याची कुजबूज आता भाजपच्याच गोटातून ऐकायला येत आहे.
गेल्या काही वर्षांत विखे परिवाराने भाजपसाठी जिल्ह्यात मोठे योगदान दिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख आणि नीलेश लंके यांच्याविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत विखेंनी जिल्ह्यामध्ये भाजपचा झेंडा अधिक मजबूत केला. नुकत्याच झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीत आमदार अक्षय कर्डिले यांच्या विक्रमी विजयासाठीही विखे परिवाराने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, एवढे मोठे राजकीय योगदान देऊनही आता पक्षातच त्यांना एकटे पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राहाता येथील सत्कार सोहळा आणि ‘ती’ उपस्थिती!
राहाता येथे नुकत्याच पार पडलेल्या एका नागरी सत्कार कार्यक्रमाने या अंतर्गत वादाच्या चर्चेला अधिक हवा दिली. या कार्यक्रमात विखेविरोधी मानल्या जाणाऱ्या अनेक नेत्यांची झालेली उपस्थिती आणि त्यांच्यातील वाढता संवाद राजकीय विश्लेषकांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. यातही विखे पाटील यांचे जुने आणि कट्टर राजकीय विरोधक असलेल्या प्रभावती घोगरे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. यामुळे भाजपमध्ये विखेंविरोधात एक नवे अंतर्गत समीकरण आकार घेत असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील भाजपच्या इतर प्रस्थापित आणि प्रभावी नेत्यांशीही विखे परिवाराचे संबंध फारसे सुरळीत नसल्याचे उघड गुपित आहे. पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते आणि कर्जत-जामखेडचे माजी मंत्री राम शिंदे यांच्याशी विखे परिवाराचा राजकीय समन्वय अपेक्षित पातळीवर दिसत नसल्याचे अनेक कार्यकर्ते खासगीत सांगतात. जिल्ह्यात प्रत्येक मोठा नेता आपापल्या मतदारसंघात स्वतंत्र ताकद बाळगून असल्याने, विखे परिवाराला संपूर्ण जिल्ह्यावर एकहाती नियंत्रण प्रस्थापित करणे कमालीचे कठीण होत चालले आहे.
दरम्यान, राहुरीचे माजी मंत्री प्रसाद तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या वाढत्या चर्चांनी जिल्ह्याच्या राजकारणात नवी उत्सुकता आणि खळबळजनक वळण आणले आहे. तनपुरे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्यास त्यांना भविष्यात मोठी संघटनात्मक किंवा राजकीय जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा आहे. जर असे झाले, तर राहुरीसह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. साहजिकच, विखे परिवाराच्या वर्चस्वासाठी हे आणखी एक मोठे आणि थेट राजकीय आव्हान ठरू शकते. प्रसाद तनपुरे तर भाजपात आले नाहीत, पण प्राजक्त तनपुरे यांनी मात्र आज भाजपात प्रवेश करून आपली राजकीय सोय पाहिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच त्यांना विधानपरिषदेसाठी शब्द दिल्याने ते भाजपात आल्याचे बोलले जात आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा वेळी जागावाटपापासून ते तिकीट वाटप आणि संघटनात्मक नियुक्त्यांपर्यंत पक्षात मोठी चुरस निर्माण होणार आहे. या बदललेल्या परिस्थितीत विखे परिवाराला विरोधी पक्षांपेक्षा स्वतःच्याच पक्षातील अंतर्गत आव्हानांचा आणि बंडखोरीचा अधिक सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
राजकीय वर्तुळातील थेट चर्चा:
“जिल्ह्यात विरोधकांना संपवून आपले निर्विवाद नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विखे परिवारालाच आता स्वतःच्या पक्षात अंतर्गत विरोधकांचा सामना करावा लागत आहे. भाजपमध्ये सुरू असलेली ही ‘शांत आणि पडद्यामागची लढाई’ पुढील काही महिन्यांत उघड संघर्षात बदलली, तर नवल वाटायला नको.”
राहुरीत राजकीय बॉम्बस्फोट! तनपुरेंची माघार की शरणागती? नगरच्या राजकारणात मोठा भूकंप!

