कारंजा तालुक्यातील गारपीट येथे जिल्हाधिकाऱ्यांचा रात्रीचा मुक्काम

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-ग्रामस्थांशी साधला थेट संवाद; वीज, पाणी व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

वर्धा (प्रकाश कथले) : ग्रामीण भागातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी कारंजा (घा.) तालुक्यातील गारपीट गावाला भेट देत रात्री मुक्काम केला. यावेळी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच विविध प्रश्नांवर संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

या दौऱ्यात जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार अनिल निनावे, अप्पर तहसीलदार नेहा मावस्कर, गट विकास अधिकारी अरुण इंगळे, विस्तार अधिकारी वानखेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी साडेसात वाजता आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात गावकऱ्यांनी पिण्याचे पाणी, रस्ते, वीजपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. गावात सध्या गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने शुद्ध व कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी गावातील रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याबाबत तसेच तेंदूपत्ता बोनस अद्याप मिळाला नसल्याबाबतही ग्रामस्थांनी तक्रारी मांडल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देत बंद असलेले पथदिवे सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

ग्रामसंवादादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील बेरोजगारी आणि आरोग्य सुविधांचाही आढावा घेतला. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या कौशल्यानुसार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगारनिर्मिती उपक्रम, स्वच्छता मोहिमा आणि ग्रामविकास कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या थेट संवादामुळे ग्रामस्थांना आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली. गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Share This Article
Exit mobile version