-चिखली येथे बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर; संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार
अंकुश पाटील (चिखली) : चिखली येथील शासकीय विश्रामगृहात दि. २९ मे रोजी मराठा सेवा संघाची बैठक जिल्हाध्यक्ष तथा माजी कार्यकारी अभियंता रविकांतजी काळवाघे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी चिखली तालुका मराठा सेवा संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून माजी प्राचार्य नंदकिशोर शेषराव गायकवाड यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत सुरेश शिवसिंग इंगळे यांची कार्याध्यक्षपदी, अर्जुनराव तुकाराम इंगळे व बाळासाहेब रावसाहेब ठाकरे यांची उपाध्यक्षपदी, शेख चाँद शेख गुलाब यांची सचिवपदी, अरुण दगडूजी गरुड व मोहन पंजाबराव ठोसरे यांची सहसचिवपदी, जीवन सूर्यभान शेटे यांची कोषाध्यक्षपदी, दशरथ रामचंद्र सावळे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी तर अॅड. सलीम शेख यांची विधी सल्लागारपदी निवड करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना रविकांतजी काळवाघे यांनी नूतन तालुकाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांना मराठा सेवा संघाच्या विचारांचा वारसा त्यांचे वडील स्वर्गीय शेषरावजी गायकवाड यांच्याकडून लाभल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली चिखली तालुक्यात मराठा सेवा संघाचे कार्य अधिक गतिमान होईल आणि संघटनेची विचारधारा अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी गटशिक्षणाधिकारी समाधान खेडेकर यांनीही संघटनेचे विचार समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. नूतन तालुकाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मराठा सेवा संघाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी रविकांतजी काळवाघे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रसिद्ध साहित्यिक आ. ह. साळुंखे लिखित ‘शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात’ हे पुस्तक भेट देण्यात आले. बैठकीस माजी गटशिक्षणाधिकारी समाधान खेडेकर, प्राचार्य सुनील देशमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजू काकडे, प्रा. डी. आर. सावळे, सौरभ शेख यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

