-ह.भ.प. आदिनाथ महाराज फपाळ यांच्या सुश्राव्य वाणीतून होणार ज्ञानयज्ञ सोहळा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : पुणे-आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टच्या वतीने अधिक मासानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. आदिनाथ महाराज फपाळ यांच्या सुश्राव्य आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून ही कथा रविवार, दि. ३१ मे ते ७ जून २०२६ या कालावधीत हरिनामाच्या गजरात संपन्न होणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली.
पुरुषोत्तम मास हा नामस्मरण, चिंतन, श्रवण, भजन आणि कीर्तनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दररोज काकडा, हरिपाठ, महिला भजन, हरी जागर आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच दुपारी २ ते ५ या वेळेत ह.भ.प. आदिनाथ महाराज फपाळ यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे निरूपण होणार आहे. या धार्मिक पर्वणीत भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भागवत कथेचा व इतर धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे. अधिक मासाच्या निमित्ताने आयोजित या ज्ञानयज्ञ सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

