अज्ञानिंना ज्ञानप्राप्तीसाठी गुरुकडेच जावे लागते — शि. भ. प. नागेश स्वामी महाराज

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-गुरुवर्यांची साखरखेर्डा नगरीतून भव्य मिरवणूक; महाप्रसादाने सप्ताहाची भक्तिमय सांगता

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : “सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय, धरावे ते पाय वेगी प्रेमे…” या अभंगाच्या ओव्यांमधून भाविकांना प्रबोधन करत शि. भ. प. नागेश स्वामी महाराज कुरूंदवाडीकर यांनी गुरूभक्ती, नामस्मरण आणि शिवपुराणाचे महत्त्व विषद केले. “सिद्ध नामाचा महिमा एवढा मोठा आहे की नामस्मरणाने केवळ कार्य सिद्ध होत नाही, तर पतितांचाही उद्धार होतो. गुरूप्रसादामुळे काम, क्रोध, मद, मत्सर यांसारख्या विकारांचा नाश होतो. अज्ञानींना ज्ञानप्राप्तीसाठी गुरूकडेच जावे लागते. गुरूच्या सानिध्यातच शिष्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते,” असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या काल्याच्या कीर्तनातून दिला.

साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात पवित्र अधिक मासानिमित्त आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी नागेश स्वामी महाराज कीर्तनातून भाविकांना संबोधित करत होते. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहात दररोज शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. आळंदी देवाची येथील हभप. प्रेममूर्ती जगदिशानंद शास्त्री यांच्या अमृतमय वाणीतून भाविकांनी शिवपुराण कथेचा रसास्वाद घेतला. कीर्तनात पुढे बोलताना नागेश स्वामी महाराज म्हणाले की, जीवनातील व्यथा कमी करावयाच्या असतील तर प्रत्येकाने शिवपुराण कथा अवश्य ऐकली पाहिजे. वारकरी आणि वीरशैव संप्रदायातील संतपरंपरेचा उल्लेख करताना त्यांनी “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” या उक्तीचा संदर्भ देत वीरशैव संप्रदायात मन्मथ स्वामी यांनी पाया रचला तर लक्ष्मण महाराज यांनी हजारो ओव्यांद्वारे त्या परंपरेचा कळस गाठला, असे सांगितले.

या प्रसंगी विचारपीठावर ष. ब्र. १०८ वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, मठाधिपती ष. ब्र. १०८ वेदांताचार्य सद्गुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज (हदगाव, नांदेड), सद्गुरू विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज (आष्टी, परतूर, जालना), माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, अमित जाधव, भाजप प्रदेश प्रतिनिधी रावसाहेब देशपांडे, माजी सरपंच महेंद्र पाटील, संदीप मगर, अशोक इंगळे यांच्यासह अनेक शिवाचार्य आणि मान्यवर उपस्थित होते. ता. २४ मे रोजी गुरूमंत्र सोहळा व शिवदीक्षा संस्कार विधी पार पडला. त्यानंतर ता. २७ मे रोजी दुपारी ४ वाजता पलसिद्ध महास्वामींच्या पादुकांची साखरखेर्डा गावातील मुख्य मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला-पुरुषांसह हजारो भाविक सहभागी झाले होते. सर्व गुरुवर्य रथावर आरूढ झाले होते. गावातील विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच महाराजांचे पाद्यपूजन करून भक्तांनी श्रद्धा व्यक्त केली. ता. २८ मे रोजी ष. ब्र. १०८ सद्गुरू वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आणि या भक्तिमय सोहळ्याची उत्साहात सांगता झाली. तळपत्या उन्हातही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग नोंदविला.

Share This Article
Exit mobile version