– साखरखेर्डा येथील श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज मठात ‘अधिक मास’ निमित्त कीर्तन सोहळा; सामाजिक सलोखा आणि श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : “प्रभू श्रीरामचंद्र ज्या वेळी वनवासाला निघाले, तेव्हा वाटेत त्यांनी अनेक भक्त आणि ऋषीमुनींची भेट घेतली. शरभंग ऋषी आणि माता शबरीची भेट घेताना लक्ष्मण आणि सीतामाई यांना काही प्रसंग संकोचजनक वाटले. त्या वेळी श्रीराम प्रभूंनी दोघांना अत्यंत मार्मिक उत्तर दिले की, ‘तुम्ही २४ तास रामासोबत राहूनही तुम्हाला राम कळाला नाही. परंतु, या भक्तांनी कित्येक वर्षे एकाच ठिकाणी बसून अनन्यभावाने माझी प्रतीक्षा केली आहे; त्यांना राम खऱ्याअर्थाने कळाला आहे.’ राम समजणे ही केवळ सहवासाची नव्हे, तर अंतःकरणातील भक्तीची गोष्ट आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री हरिचैतन्य महाराज यांनी येथे केले.
येथील प्रसिद्ध श्री पलसिद्ध महास्वामी मठात अधिक मासानिमित्त विशेष कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भाविकांना ‘अध्यात्म आणि सामाजिक भान’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कीर्तन सेवेचे निरूपण करताना हरिचैतन्य महाराजांनी एका पौराणिक कथेचा दाखला देत मानवी स्वभावातील असूयेवर (जळफळाट) प्रहार केला. ते म्हणाले,
“भगवान शिव हे अत्यंत भोळे आणि आशुतोष आहेत. मनोभावे आराधना करणाऱ्याला ते प्रसन्न होतात. एका गरीब लाकूडतोड्याने शंकराला प्रसन्न करून केवळ पोटभर अन्नाची मागणी केली. देवाने ती पूर्ण केली; मात्र शेजाऱ्याला त्याचा हेवा वाटला. त्यानेही शंकराची तपश्चर्या केली, पण मागणी करताना ‘शेजाऱ्याचे घर पडू दे’ असा आकुंचित आणि दुष्ट हेतू ठेवला. देवाने ‘तथास्तू’ म्हटले, पण निसर्गाच्या नियमानुसार त्याचा फटका आधी त्या शेजाऱ्यालाच बसला. आज समाजातही हीच वृत्ती वाढीस लागत आहे.”
“सामाजिक क्षेत्रात काम करताना आपल्याला एखाद्याला मदत करता आली नाही तरी चालेल, पण कोणाच्या कार्यात अडथळा निर्माण करू नका. ईश्वराकडे मागणी करताना नेहमी ‘बहुजन हिताय’ भावना ठेवावी, कारण नकारात्मक विचार हा मानवाला अधोगतीकडे नेतो,” असा कानमंत्र त्यांनी दिला.
साखरखेर्डा नगरीला लाभलेल्या आध्यात्मिक वारशाचा उल्लेख करताना महाराज म्हणाले की, “श्री पलसिद्ध महास्वामी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. मठाचे पहिले बांधकाम सुमारे १ हजार वर्षांपूर्वी, तर दुसऱ्या टप्प्यातील काम ५०० वर्षांपूर्वी झाले होते. आता तिसऱ्या टप्प्यातील भव्य काम सद्गुरू शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कार्यकाळात पूर्णत्वास जात आहे. आपल्याला अत्यंत नम्र आणि सहनशील गुरु लाभले आहेत, हे या परिसराचे भाग्य आहे.”
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंगांचे निरूपण करताना त्यांनी अंधश्रद्धेवर कडक शब्दांत प्रहार केला.
“माझा कोणत्याही चमत्कारावर विश्वास नाही, तर माझा निस्सीम विश्वास केवळ ‘श्रद्धेवर’ आहे. या जगात कोणीही कृत्रिम चमत्कार करू शकत नाही. जे साधू किंवा महाराज स्वतःला चमत्कारी पुरुष म्हणून मिरवतात, ते निव्वळ ‘ढोंगी बाबा’ असून समाजाची फसवणूक करत आहेत. अशा भोंदूगिरीपासून सर्वसामान्य नागरिकांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे,” असे रोखठोक प्रबोधन त्यांनी या वेळी केले.
कीर्तन सोहळ्याच्या प्रारंभी आजचे मुख्य प्रायोजक माजी सरपंच पूनम पाटील आणि महेंद्र पाटील यांनी सपत्नीक व्यासपीठावरील महाराजांचे पूजन करून त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी विचारपीठावर मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, शिवशंकर शिवाचार्य महाराज, काशीनाथ शिवाचार्य महाराज, शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्यासह अनेक गुरुवर्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

