शिवसेनेच्या ‘भगव्या’ दणक्याने मुजोर प्रशासन ताळ्यावर! अमोलदादा म्हस्के पाटलांच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनापुढे अखेर कंत्राटदार वाकले!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

– मेहकर-हिवरा आश्रम मृत्यूच्या महामार्गावरील जीवघेण्या भेगा बुजविण्यास अखेर सुरुवात; अमोलदादा म्हस्के पाटलांसह माजी आ.संजय रायमुलकर, ऋषीभाऊ जाधव व शिवसैनिकांची आक्रमक भूमिका आली फळाला!

हिवरा आश्रम (अरूणा म्हस्के पाटील) : प्रशासकीय अनास्था, अधिकाऱ्यांची सुस्ती आणि कंत्राटदारांच्या मुजोरीमुळे रोज निष्पाप जनतेचे बळी घेणाऱ्या मेहकर ते हिवरा आश्रम रस्त्यावरील जीवघेण्या भेगांच्या विरोधात  ‘शिवसेना स्टाईल’ने रणशिंग फुंकले गेले! गेल्या अनेक वर्षांपासून जनतेसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनलेल्या या रस्त्यासाठी शिवसेनेचे युवा नेते तथा ब्रम्हपुरीचे माजी उपसरपंच अमोलदादा म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात नागझरी बुद्रुक येथे भर रस्त्यात थेट ‘अर्धनग्न आंदोलन’ करण्यात आले होते. शिवसेनेचा हा धगधगता आक्रमक पवित्रा आणि लोकप्रतिनिधींचा दणका यामुळे सुस्त प्रशासनाचे पुरते धाबे दणाणले असून, मेहकर-हिवरा आश्रम आणि चिखली रस्त्यावरील जीवघेण्या भेगा बुजविण्याच्या कामाला आजपासून अखेर युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.

मेहकर ते हिवरा आश्रम हा रस्ता सध्या रस्ता उरलेला नसून तो ‘मृत्यूचा महामार्ग’ बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या महाकाय आणि जीवघेण्या भेगांमुळे दररोज दुचाकींचे भीषण अपघात होत आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, कित्येक तरुण कायमचे अपंग झाले. या गंभीर परिस्थितीबाबत युवा नेते अमोलदादा म्हस्के पाटील यांनी वारंवार संबंधित विभागाच्या कुंभकर्णी झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जनतेच्या जिवावर चरणाऱ्या आणि एसी केबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे ‘उडवाउडवीची उत्तरे’ देऊन जनतेच्या जीवाशी क्रूर खेळ केला जात होता.

जनतेचा आक्रोश पाहून अखेर शिवसेनेचा संयम सुटला. २५ मे रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता नागझरी बुद्रुकजवळ मुख्य रस्त्यावरील त्याच जीवघेण्या भेगांमध्ये अमोलदादा म्हस्के पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी ठिय्या मांडला आणि थेट ‘अर्धनग्न आंदोलन’ सुरू केले. या आंदोलनाची धग एवढी तीव्र होती की संपूर्ण परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला.

या जनआक्रोशाची दखल घेत शिवसेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर आणि ऋषीभाऊ जाधव यांनी देखील तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “जनतेचा जीव जात असताना प्रशासन डोळ्यांवर कातडे ओढून बसणार असेल, तर गाठ शिवसेनेशी आहे,” असा सज्जड दम या नेत्यांनी वरिष्ठांना दिला. त्याच वेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांनी घटनास्थळी वादळासारखी भेट देऊन प्रशासनाला थेट आणि कडक शब्दांत सुनावले,

“हा निर्लज्जपणा आता खपवून घेतला जाणार नाही! गुरुवारपर्यंत जर या भेगा बुजवल्या नाहीत, तर शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल!”

या धडक आंदोलनात अमोलदादा म्हस्के पाटील यांच्यासोबत छगन नाना, सचिन काटे, विनोद आखरे, अनिल कांबळे, विजय चव्हाण, सचिन सरकटे, नवघरे, गजानन देवकर, प्रशांत मगर, बाळू काळे यांच्यासह शेकडो संतप्त नागरिक आणि वाघाच्या काळजाचे शिवसैनिक मैदानात उतरले होते.

अखेर मुजोर अधिकारी नतमस्तक!

आंदोलनाचा भडका उडालेला पाहून आणि लोकप्रतिनिधींसह जनतेचा उफाळलेला रोष पाहून संबंधित विभागाचे अधिकारी चव्हाण साहेब यांचे धाबे दणाणले. त्यांनी तात्काळ फोन फिरवून अमोलदादा म्हस्के पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि गयावया करू लागले. मात्र, अमोलदादांनी तोफ डागली, “जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि डोळ्यांदेखत काम सुरू होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून एक पाऊलही मागे हटणार नाही!”

अखेर पुरते नरमलेल्या चव्हाण साहेबांनी, “मला दोन ते तीन दिवसांचा वेळ द्या, गुरुवारपर्यंत १०० टक्के या जीवघेण्या भेगा बुजवून देतो,” अशी विनवणी केली. शिवसेनेने नेहमीप्रमाणे जनतेच्या सोयीसाठी समजूतदारपणा दाखवत आपले आंदोलन गुरुवारपर्यंत स्थगित केले होते. मात्र, “हा केवळ विराम आहे, पूर्णविराम नाही! शब्द पाळला नाही तर गाठ शिवसेनेशी आहे,” असा सज्जड दमही प्रशासनाला भरला होता.


भगव्याचा दणका: काम सुरू!

शिवसेनेच्या या ‘भगव्या इशाऱ्या’ची दहशत एवढी होती की, प्रशासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे आजपासून मेहकर, हिवरा आश्रम आणि चिखली रस्त्यावरील जीवघेण्या भेगा बुजविण्यास तातडीने सुरूवात केली आहे. या कामाची पाहणी अमोलदादा म्हस्के पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली व समाधान व्यक्त केले. मात्र, काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास कंत्राटदाराला थेट शिवसेनेच्या भाषेत ‘प्रसाद’ दिला जाईल, असा सुप्त इशाराही शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे. अखेर शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासनाला गुडघे टेकावेच लागले!

Share This Article
Exit mobile version