सरन्यायाधीश बनताच ९०वर्षीय वडिलांच्या पाया पडले!
नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात आयोजित शपथ ग्रहण सोहळ्यात शपथ दिली. सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपले ९० वर्षीय वडिल तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती उमेश रंगनाथ लळीत यांचे पायापडून आशीर्वाद घेतले. या शपथविधी सोहळ्यास मावळते सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
२०१४ मध्ये न्यायमूर्ती उदय लळीत यांनी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती स्वीकारली होती. तत्पूर्वी ते वरिष्ठ अधिवक्ता होते. त्यांनी आपल्या न्यायमूर्तीपदाच्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक निवाडे दिले आहेत. तीन तलाकविरोधी निवाडाही त्यांचाच होता. सरन्यायाधीशपदी नियुक्ती होताच, न्यायमूर्ती लळीत यांच्यासमोर संविधानपीठासह अनेक महत्वपूर्ण खटले सुनावणीसाठी येणार आहेत. सरन्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाळ हा एकूण ७४ दिवसांचा राहणार आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी म्हणजे यावर्षी ८ नोव्हेंबर २०२२ रोजी ते सेवानिवृत्त होतील. त्यांच्यानंतर वरिष्ठ न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश होतील.
सोलापूरकरांसाठी आनंदाचा दिवस
लळीत घराणे तसे पाहता मूळचे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये-कोठारवाडीचे. परंतु शंभर वर्षापूर्वी हे या घराण्यातील रंगनाथ ऊर्फ आण्णासाहेब लळीत हे सोलापुरात आले आणि येथेच स्थायिक झाले. ते स्वतः निष्णात वकील होते. त्यांचे पुत्र उमेश, जयंत, सुभाष आणि आनंद यांनीही वकिली व्यवसायाचा वारसा चालविला. उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. त्यांचे पुत्र उदय आणि सुबोध हे तिसऱ्या पिढीतील आणि उदय यांचे पुत्र श्रीयश हे चौथ्या पिढीचा वकिली वारसा चालवत आहेत. हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये रंगनाथ ऊर्फ आण्णासाहेब लळीत वृत्तपत्र विभाग तसेच वकिलांसाठी आनंदराव लळीत विधी ग्रंथ विभाग कार्यरत आहे. याच कुटुंबातील सविता लळीत यांनी सेवासदन शिक्षण संस्थेची अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. न्या. उदय लळीत यांचे आजोबा रंगनाथ लळीत वकील यांनी, स्वातंत्र्य लढ्यात १९३० साली सोलापुरात झालेल्या मार्शल लाॕ चळवळीत ब्रिटिश सैनिकांनी जो अमानुष अत्याचार केला होता, त्याबद्दल नुकसान भरपाईचे चार दावे न्यायालयात दाखल केले होते. ब्रिटिश सत्तेविरूध्द त्यांनी निर्भयपणे न्यायालयीन लढाई केली होती. न्या. उदय लळीत यांचे शालेय शिक्षण सोलापुरात हरिभाई देवकरण प्रशालेत झाले होते. सोलापुरात लळीत कुटुंबीय भुईकोट किल्ल्याजवळ लकी चौकात स्वतःच्या वास्तुमध्ये अनेक वर्षे राहिले. सोलापूरचा कर्तबगार सुपुत्र उदय उमेश लळीत हे देशाचे सरन्यायाधीश झाल्यामुळे सार्वत्रिक समाधान व्यक्त करण्यात आले. विशेषतः वकिली क्षेत्रात विशेष आनंद व्यक्त करण्यात आला. सोलापूर बार असोसिएशनने सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांचा सोलापुरात लवकरच नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्याचे ठरविले आहे.

