मेहकरचा रस्ता की मृत्यूचा सापळा? सुस्त प्रशासनाच्या छाताडावर बसून शिवसेनेचे ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

– युवा नेते अमोलदादा म्हस्के पाटलांचा कडक ‘अल्टिमेटम’; गुरुवारपर्यंत जीवघेण्या भेगा बुजवा, अन्यथा शुक्रवारी कंत्राटदाराची खैर नाही!
– रस्त्यावरील जीवघेण्या भेगांवर शिवसेनेचा ‘बाण’; नागझरी बुद्रुकजवळ अमोलदादा म्हस्के पाटलांचे थरारक ‘अर्धनग्न आंदोलन’!

हिवरा आश्रम (अरूणा म्हस्के) : प्रशासकीय अनास्था आणि कंत्राटदारांच्या मुजोरीमुळे निष्पाप जनतेचे बळी घेणाऱ्या मेहकर ते हिवरा आश्रम रस्त्यावरील जीवघेण्या भेगांच्या विरोधात अखेर शिवसेनेने आपले पारंपरिक ‘शिवसेना स्टाईल’ रणशिंग फुंकले आहे! गेल्या अनेक वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्यासाठी ब्रम्हपुरीचे माजी उपसरपंच आणि युवा नेते अमोलदादा म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात नागझरी बुद्रुक येथे भर रस्त्यात थेट ‘अर्धनग्न आंदोलन’ छेडण्यात आले. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सुस्त प्रशासनाचे धाबे दणाणले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत लोटांगण घातले आहे.

मेहकर ते हिवरा आश्रम हा रस्ता सध्या मृत्यूचा महामार्ग बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या महाकाय आणि जीवघेण्या भेगांमुळे दररोज दुचाकींचे भीषण अपघात होत आहेत. अनेकांनी आपले प्राण गमावले, तर अनेक तरुण कायमचे अपंग झाले. या गंभीर परिस्थितीबाबत युवा नेते अमोलदादा म्हस्के पाटील यांनी वारंवार संबंधित विभागाच्या कुंभकर्णी झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांकडून ‘उडवाउडवीची उत्तरे’ देऊन जनतेच्या जीवाशी खेळ केला जात होता. अखेर, जनतेचा हा आक्रोश पाहून शिवसैनिक गप्प बसणे शक्यच नव्हते! कोणत्याही परिणामांची पर्वा न करता, २५ मे रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता अमोलदादा म्हस्के पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नागझरी बुद्रुकजवळ मुख्य रस्त्यावरील त्या जीवघेण्या भेगांमध्येच ठिय्या मांडला आणि ‘अर्धनग्न आंदोलन’ सुरू केले.

या आंदोलनाची धग एवढी तीव्र होती की, संपूर्ण परिसरात नागरिकांचा संताप अनावर झाला होता. याच दरम्यान शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला थेट आणि कडक शब्दांत सुनावले. “एवढे अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात असताना कंत्राटदार आणि अधिकारी डोळ्यांवर कातडे ओढून बसलेत का? हा निर्लज्जपणा आता सहन केला जाणार नाही. गुरुवारपर्यंत जर या भेगा बुजवल्या नाहीत, तर शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशा इशारा मायाताई म्हस्के यांनी दिला आहे.


‘चव्हाण साहेबांनी’ घेतली धास्ती; गुरुवारचा ‘अल्टिमेटम’!

आंदोलन पेटल्याचे आणि जनतेचा रोष पाहून संबंधित विभागाचे अधिकारी चव्हाण साहेब यांनी तात्काळ फोनवरून अमोलदादा म्हस्के पाटील यांच्याशी संपर्क साधला. “जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि काम सुरू होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही!” अशी आक्रमक आणि ठाम भूमिका अमोलदादांनी घेतली. अखेर नरमलेल्या चव्हाण साहेबांनी, “मला दोन ते तीन दिवसांचा वेळ द्या, मी गुरुवारपर्यंत १०० टक्के या जीवघेण्या भेगा बुजवून देतो,” अशी विनवणी वजा समजूत काढली. शिवसेनेने जनतेच्या सोयीसाठी समजूतदारपणा दाखवत आपले आंदोलन गुरुवारपर्यंत स्थगित केले आहे. मात्र, हा केवळ ‘विराम’ आहे, ‘पूर्णविराम’ नाही, असा सज्जड दमही भरला आहे.


पूर्वसूचना न देता ‘ठाकरे शैलीत’ झोडपणार!

अमोलदादा म्हस्के पाटील यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे की, आतापर्यंत भरपूर अर्ज-विनंत्या आणि सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत काम झाले नाही, तर शुक्रवारी किंवा त्यानंतर कोणत्याही दिवशी, कोणतीही पूर्वसूचना न देता हजारो शिवसैनिक, महिला, बालके आणि वृद्धांसह मुख्य रस्त्यावर तीव्र ठिय्या आंदोलन करतील. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला केवळ आणि केवळ संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारच जबाबदार असतील! या धडक आंदोलनात अमोलदादा म्हस्के पाटील यांच्यासोबत छगन नाना, सचिन काटे, विनोद आखरे, अनिल कांबळे, विजय चव्हाण, सचिन सरकटे, नवघरे, गजानन देवकर, प्रशांत मगर, बाळू काळे यांच्यासह शेकडो संतप्त नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version