पाथर्डीत उद्या ‘रस्ता रोको’ आंदोलनाची हाक

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-मयत विठ्ठल खर्चन प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक

बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते विठ्ठल खर्चन यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित पाथर्डी पोलीस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उद्या बुधवारी (दि. २७ मे) पाथर्डी येथे भव्य ‘रस्ता रोको’ व ‘ठिय्या आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे.

विठ्ठल खर्चन यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, मयत विठ्ठल खर्चन यांचे शवविच्छेदन अद्याप झाले नसून, पाथर्डी पोलीस स्टेशनसमोर शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. हे आंदोलन उद्या सकाळी ९ वाजता पाथर्डी शहरातील मा. वसंतराव नाईक चौक येथे होणार असून, वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडणार आहे.

या आंदोलनात जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य तसेच भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा संघटक रवींद्र निळ, पाथर्डी तालुकाध्यक्ष श्रीकांत (पप्पुशेठ) बोर्डे, शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलालभाई शेख, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे आणि युवा शेवगाव तालुका अध्यक्ष ऑगस्टिन गजभीव यांनी केले आहे. “न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Share This Article
Exit mobile version