चार जणांना चौकशी नोटिसा; सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल
आळंदी (अर्जुन मेदनकर) : माऊली मंदिरातील दानपेटीतील देणगी रकमेच्या अपहार प्रकरणात आळंदी देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही, असा स्पष्ट इशारा पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिला. या प्रकरणात संबंधित आरोपीविरोधात देवस्थानने स्वतः तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविला असल्याचेही त्यांनी सांगितले.
माऊली मंदिरातील भक्त निवास येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर तसेच ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते. ॲड. उमाप यांनी सांगितले की, या प्रकरणात व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लेखापाल आणि अन्नदान विभाग प्रमुख अशा चार जणांना खुलासा मागवण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मंदिरातील कर्मचारी व सेवकांच्या कामकाजावर अधिक कडक नजर ठेवली जाणार असून सुरक्षा आणि प्रवेश व्यवस्थेबाबत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. दानपेटी अपहार प्रकरणातील संशयित विशाल वारुळे हा देवस्थानचा कायम कर्मचारी नसून विविध विभागांमध्ये सेवाभावातून काम करत होता. अन्नदान विभाग तसेच पालखी सोहळ्यात आचारी म्हणूनही त्याने काम केले होते. त्यामुळे त्याच्यावर कोणी संशय घेतला नव्हता. मात्र त्याच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्याने देवस्थानने पोलिसांत तक्रार दाखल केली, असे उमाप यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर परिसरात कर्मचारी, सेवेकरी आणि सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले असून प्रवेश आणि निर्गमनासाठी निश्चित प्रवेशद्वारांचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. ये-जा करणाऱ्यांची तपासणी सुरक्षा रक्षकांकडून केली जाणार आहे. तसेच मंदिर परिसरात पिशव्या किंवा संशयास्पद वस्तूंवर निर्बंध घालण्यात आले आहेत. दानपेटीतील रक्कम मोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहितीही ॲड. उमाप यांनी दिली. कर्मचारी आणि सेवेकऱ्यांची उपस्थिती डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीद्वारे नोंदविण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “माऊली मंदिरातील देणगी ही भाविकांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेशी कुणीही खेळू देणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे ठाम मत ॲड. उमाप यांनी व्यक्त केले.

