-विद्युत पोलवर काम करताना बसला जबरदस्त विजेचा धक्का; २५ वर्षांतील पाचवी घटना
साखरखेर्डा (अशोक इंगळे): साखरखेर्डा येथील वीज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा विद्युत पोलवर काम करताना विजेचा जबरदस्त धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज २६ मे रोजी पिंपळगाव सोनारा शिवारात घडली. मृत कामगाराचे नाव बद्रीनाथ लक्ष्मण लंबे (वय ३५) असे आहे.
मागील दिवशी सायंकाळी वादळामुळे साखरखेर्डा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल पाच तासांनंतर रात्री १० वाजताच्या सुमारास काही भागातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र ग्रामीण भागातील काही ठिकाणी अजूनही वीजपुरवठा बंद होता. रात्री उशिरापर्यंत वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी दुरुस्तीचे काम सुरू ठेवत वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पिंपळगाव सोनारा परिसरातील दुरुस्तीचे काम बाकी असल्याने बद्रीनाथ लंबे हे सकाळी सुमारे ९ वाजता मारोती आश्रू वायाळ यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मरजवळील वीज वाहक पोलवर चढून काम करत होते. यावेळी अचानक त्यांचा वीज वाहक तारेला स्पर्श झाला आणि त्यांना जबरदस्त विजेचा धक्का बसला. गंभीर भाजल्याने ते खाली कोसळले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ त्यांना साखरखेर्डा येथील डॉ. विशाल मगर यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चिखली येथे हलविण्याचा सल्ला दिला. चिखली येथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शिंदी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बद्रीनाथ लंबे यांनी कामावर जाण्यापूर्वी साखरखेर्डा ३३ केव्ही उपकेंद्रातून नियमानुसार परवानगी घेतली होती का, जर परवानगी घेतली असेल तर वीजपुरवठा सुरू कसा राहिला, त्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण, असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात कनिष्ठ अभियंता रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. वृत्त लिहीपर्यंत साखरखेर्डा पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. घटनेची माहिती मिळताच सिंदखेडराजा येथील वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्रीनिवास बडगू यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ३३ केव्ही उपकेंद्रातील हजेरी बुक गायब असल्याचे समोर आल्याची माहिती मिळाली. त्यांनी कामावर असलेल्या ऑपरेटरकडे अनेक प्रश्नांची विचारणा केली, मात्र समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे समजते. उपअभियंता श्रीनिवास बडगू यांनी “कंत्राटी कामगाराच्या अपघाताची दोन दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल,” असे सांगितले.

