-लोणार नगर परिषदेकडून मुख्याधिकारी डॉ. बोबडे यांच्या हस्ते गौरव
लोणार (वाजिद खान): भारताच्या १६ व्या देशव्यापी जनगणना अभियानांतर्गत सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील घर सूचीकरण व घर गणना कार्यात लोणार येथील इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहायक शिक्षक तसलीम अली रफिक अली यांनी आपले उद्दिष्ट सर्वप्रथम १०० टक्के पूर्ण करून विशेष बहुमान पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोणार नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा जनगणना चार्ज अधिकारी डॉ. बोबडे यांच्या हस्ते शाल देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणना प्रक्रियेत अनेक तांत्रिक तसेच क्षेत्रीय अडचणींचा सामना करावा लागत असतानाही तसलीम अली यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि तत्परतेने आपले कार्य वेळेआधी पूर्ण केले. राष्ट्रीय कर्तव्याप्रती दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाचे प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आले. या गौरव सोहळ्याप्रसंगी लोणार नगर परिषदेचे जनगणना सहायक तथा लिपिक श्री. एन्नेवार, जनगणना पर्यवेक्षक श्री. बोरुड तसेच सहायक श्री. नईम खान उपस्थित होते. मान्यवरांनी तसलीम अली यांच्या कार्याचे अभिनंदन करत त्यांच्या या यशातून इतर प्रगणक व शिक्षकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. सलीम अली यांच्या या यशामुळे इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल तसेच संपूर्ण लोणार शिक्षण वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

