टिप्परने दुचाकीस चिरडले; 3 जण जागीच ठार!

editor 2 Min Read
2 Min Read

बुलडाणा – बुलडाणा तालुक्यातील धाड पोस्टे. अंतर्गत असलेल्या अजिंठा रोडवरील मढ फाटा जवळील महानुभव आश्रमाजवळ अजिंठयाकडून गिट्टीचा ट्रक घेवून येणा-या भरधाव टिप्परने बुलडाणा कडून पानवडोद खु.ता.सिल्लोडकडे जाणा-या ज्ञानेश्वर सुरोशे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत मोटार सायकलवरील ३ जण जागीच ठार झाले. सदर घटना आज मंगळवार १४ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात जखमी झालेल्या महिलेवर बुलडाणा येथे प्रथमोपचार करुन पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पानवडोद खु. ता. सिल्लोड येथील ज्ञानेश्वर सुरोशे हे शिवणी ता. सिंदखेड राजा येथे बहिणीच्या घरुन भाचा अमरदीप जाधव याला घेवून चिखली येथील बहिणीच्या घरी गेले होते. त्यानंतर बुलडाणा तालुक्यातील सासरवाडी कोलवड येथून सालाचा मुलगा शंतनू वैद्य याला घेवून पत्नी वनितासह मोटर सायकल क्र.एम एच-२० सीडी- ०७३० ने बुलडाणावरुन गावाकडे जात असतांना आज १४ जून रोजी त्यांच्या मोटार सायकलला दुपारी ३ वाजेच्या दरम्यान धाड पोस्टे.अंतर्गत असलेल्या मढ फाट्याजवळ समोरून गिट्टी घेवून येणाNया भरधाव टिप्पर क्र. एम.एच-२८ ऐबी.७५९४ ने ज्ञानेश्वर सुरोशे यांच्या मोटर सायकल जोरदार धडक दिली. अपघातामध्ये दुचाकीचा अक्षरश: चुराडा होवून यामध्ये दुचाकी चालक ज्ञानेश्वर सुरोशे (वय ३७), अमरदीप जाधव (वय १५), व शंतनु वैद्य (वय ९) हे जागेवरच ठार झाले तर ज्ञानेश्वर सुरोशे यांची पत्नी सौ.वनिता ज्ञारेश्वर सुरोशे (वय ३५) ह्या गंभीर जमखी झाल्याने त्यांच्यावर बुलडाणा येथे उपचार करुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच धाड पोस्टे.चे ठाणेदार पाटील कर्मचा-यांसह घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला. रात्री उशीरापर्यंत धाड पोस्टे.ला या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Share This Article
Exit mobile version