घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा केल्याप्रकरणी चिखलीत गुन्हा दाखल; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची कारवाई

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत आरोपी आरोपी शेख गणी उर्फ शेख दादूविरूद्ध झाले गुन्हे दाखल

चिखली (अंकुश पाटील): घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा आणि अघोरी प्रथा अवलंबल्याच्या आरोपावरून चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथे एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण संजय साळवे (वय २९, रा. मकरध्वज खंडाळा) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असून, त्यांची पत्नी गावात वास्तव्यास आहे. दि. १७ मे २०२६ रोजी सकाळी फिर्यादी साळवे हे नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर गेले असताना, त्यांच्या पत्नीने फोन करून घराच्या वरांड्यात एक पूर्ण आणि एक अर्धवट कापलेले लिंबू पडले असल्याची माहिती दिली. फिर्यादीने तत्काळ घरी येऊन पाहणी केली असता, त्यांना वरांड्यात लिंबू पडलेले दिसले. या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संशयावरून साळवे यांनी घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यात सकाळी ५.१३ वाजताच्या सुमारास शेजारी राहणारा संशयित आरोपी शेख गणी उर्फ शेख दादू हा घरासमोर लिंबू टाकताना आढळून आला.

या अघोरी प्रकारानंतर फिर्यादीने ऑल इंडिया पँथर सेनेचे विदर्भ अध्यक्ष संकेत जाधव यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संकेत जाधव यांनी चिखली पोलीस स्टेशन गाठून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर चिखली पोलिसांनी तातडीने दखल घेत आरोपी शेख गणी उर्फ शेख दादू याच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या कलम ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पो.ह. मगर करत आहेत. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत झालेल्या या कारवाईमुळे मकरध्वज खंडाळा परिसरात सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

खंडाळा मकरध्वज येथे अघोरी कृत्याचा प्रकार; दारात मंत्रलेले लिंबू टाकल्याचे CCTV मध्ये कैद

Share This Article
Exit mobile version