जळगाव जामोद हादरले! कौटुंबिक वादातून पित्याने चार लहान मुलांना विहिरीत फेकून स्वतःही संपवले जीवन; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

पती-पत्नीच्या वादात निष्पापांचे बळी; पोटच्या चार लेकरांना निर्दयीपणे विहिरीत फेकले; भाले अंजन परिसरावर शोककळा, पोलीस बंदोबस्तात पाचही मृतदेहांचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन

जळगाव जामोद/बुलढाणा (बाळू वानखेडे): बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील राजुरा शिवारात कौटुंबिक कलहातून एका २७ वर्षीय पित्याने आपल्या चार निष्पाप चिमुरड्यांना विहिरीत फेकून स्वतःही उडी घेत आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेत पित्यासह दोन मुले आणि दोन मुली अशा एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. २५ मे रोजी सकाळी ही विदारक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण विदर्भासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

विजय मुसा किराडिया (वय २७, रा. भाले अंजन/राजुरा ग्रामपंचायत उमापूर) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. तर प्रित किराडिया (वय ७ वर्षे), प्राची किराडिया (वय ५ वर्षे), पूर्वी किराडिया (वय ३ वर्षे) आणि अवघ्या दीड वर्षाचा पियुष किराडिया अशी मृत्युमुखी पडलेल्या चारही निष्पाप भावंडांची नावे आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विजय किराडिया आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते. याच वादातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. दरम्यान, घटनेच्या आधी विजय यांनी पत्नीची समजूत काढून तिला माहेरी सोडले होते. पत्नीला सोडून घरी परतल्यानंतर विजय हे घरातील काम करत होते.

त्याच वेळी त्यांचे वडील मुसा किराडिया यांनी विजयला सहज, “तुझी बायको कुठे गेली?” असा प्रश्न विचारला. आधीच मानसिक तणावात असलेल्या विजय यांचा या प्रश्नावरून पित्ता खवळला आणि घरात पुन्हा तीव्र वाद निर्माण झाला. याच संतापाच्या आणि नैराश्याच्या भरात त्यांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. २४ मे च्या मध्यरात्री ते २५ मे च्या पहाटे दरम्यान, विजय यांनी आपल्या चारही लहान मुलांना सोबत घेत राजुरा धरण परिसरातील एक विहीर गाठली आणि हे भीषण पाऊल उचलले.

सकाळी विहिरीत मृतदेह तरंगताना दिसले अन्…

ही संपूर्ण घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने कोणालाही याचा सुगावा लागला नाही. २५ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास राजुरा शिवारामधून जाणाऱ्या काही ग्रामस्थांना विहिरीत तीन मृतदेह तरंगताना दिसले. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने आपत्कालीन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत शोधमोहीम राबवली असता, पोलिसांना एकापाठोपाठ एक असे पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. अवघ्या दीड वर्षाच्या पियुषसह चारही चिमुरड्यांचे मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

“सर्व मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक दृष्ट्या हा कौटुंबिक वादातून घडलेला प्रकार दिसत असून, पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. घटनास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.”स्थानिक पोलीस प्रशासन, जळगाव जामोद.

या धक्कादायक घटनेमुळे भाले अंजन आणि राजुरा परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे. एकाच घरातील पाच जणांची अशी क्रूर वाताहत झाल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले असून, गावातील शेकडो नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. पोलीस सध्या कुटुंबीय आणि स्थानिक गावकऱ्यांची चौकशी करत असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Share This Article
Exit mobile version