-आत्माराम वानखडे यांचे निधन; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, मंगळवारी रक्षा विसर्जन
मेहकर (जिल्हा प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा धम्म उपासक आत्माराम सुखदेव वानखडे (वय ६९) यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान २३ मे रोजी रात्री १० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज २४ मे रोजी दुपारी देऊळगाव साखरशा येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी २६ मे रोजी सकाळी १० वाजता रक्षा विसर्जन व पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कै. आत्माराम वानखडे हे सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. धम्म शिबिरे, श्रामणेर शिबिरे तसेच विविध बौद्ध धम्मकार्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आंबेडकरी चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ते विविध आजारांनी त्रस्त होते. त्यांच्यावर खामगाव, अकोला आणि नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान नागपूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, तीन मुली, भाऊ, बहीण, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

