– वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने; पावसाळ्यात दळणवळण ठप्प!
– तपोवन देवी ते आंत्रिखेडेकर मार्गाची दयनीय अवस्था; रस्ता मंजूर असूनही पाच महिन्यांपासून काम रखडले!
चिखली (अंकुश पाटील) : तालुक्यातील रोहडा आणि आंत्रिखेडेकर परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तपोवन देवी ते आंत्रिखेडेकर आणि रोहडा ते आंत्रिखेडेकर या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांचे काम तातडीने सुरू न झाल्यास, येत्या १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
आंत्रिखेडेकर ते तपोवन देवी हा गावजोड रस्ता मंजूर झाला आहे. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे प्रत्यक्ष कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामस्थ या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. चालू वर्षात या कामासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आली आहेत, तरीही प्रशासन सुस्त असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
कृषी विकासाला बसतोय ब्रेक! या भागात बारमाही आणि मजबूत रस्ता झाल्यास दुग्ध व्यवसाय, शेती, शेळीपालन, कुक्कुटपालन, भाजीपाला आणि फळबाग उत्पादनाला मोठी चालना मिळू शकते. दळणवळणाची सुविधा नसल्याने स्थानिक कृषी विकासाला ब्रेक लागला आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनापलीकडे काहीच हाती न आल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर राहुल टाकळकर, संजय खेडेकर, समाधान खेडेकर, नारायण चित्राने, राजेंद्र बोरकूल, विनायक खेडेकर, जयराम खेडेकर, समाधान पेंढारकर, सुभाष खेडेकर, अमोल मोरे, जयनारायण खेडेकर यांच्यासह गणेश पर्राड, अण्णा माळेकर, उत्तम माळेकर, नारायण खेडेकर, दगडू खेडेकर, शांताराम मोरे, रतन बभ्रूले, भीमराव तळेकर, शांतिलाल खरात, प्रताप खरात, मधुकर शेळके व सागर खरात आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

