इंधनासाठी रांगेत थांबणाऱ्यांसाठी थंड पाण्याची सुविधा!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– बळीराजाच्या तृष्णातृप्तीसाठी राजर्षी शाहू मल्टिस्टेटचा पुढाकार; संदीपदादा शेळके यांची संकल्पना!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : इंधन टंचाईच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकरी तथा नागरिकांची तहान भागवण्यासाठी राजर्षी शाहू मल्टिस्टेटने पुढाकार घेतला आहे. पेट्रोल, डिझेलसाठी कडक उन्हात रांगेमध्ये उभ्या बळीराजाकरिता जिल्हाभरात थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काँग्रेस नेते संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या संकल्पनेतून २२ मे रोजी या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. इंधन टंचाई निवारण होईपर्यंत जिल्हाभर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

एकीकडे सूर्य आग ओकतोय. तापमान ४३ अंशाच्या पुढे सरकले आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. अशावेळी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल, डिझेलसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. कडक उन्हात इंधन घेण्यासाठी उभ्या राहणाऱ्या नागरिकांना थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान धामणगाव बढे, शेंबा, मोताळा, उदयनगर, आंबेटाकळी, नांदुरा, पातूर्डा, संग्रामपूर, जळगाव, खामगाव, शेगाव, वरवट बकाल, मेहकर, देऊळगाव साकरशा, जानेफळ, सुलतानपूर, बिबी, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा येथे शुक्रवारी पाणीवाटप करण्यात आले. मागणीनुसार पुढेही जिल्हाभर पाणी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्यावतीने देण्यात आली.

सध्या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलच्या कमतरतेमुळे नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे. शेतीचे कामे सुरू असल्यामुळे शेतकरी वर्ग आणि सामान्य नागरिकांची इंधनासाठी पळापळ होत आहे. दिवसभर आणि रात्रीही शेतकरी रांगेत थांबत आहेत. आपला नंबर हुकला तर डिझेल मिळणार नाही, या भीतीने त्यांना रांग सोडून जाता येत नाही. त्यांना खायची, प्यायची कशाचीच पर्वा राहिलेली नाही. अशावेळी सामाजिक उपक्रमांत सदैव पुढाकार घेणाऱ्या राजर्षी शाहू मल्टिस्टेटने त्यांच्यासाठी थंड पाण्याची सुविधा केली आहे. कडक उन्हात थंडगार पाणी प्यायला मिळाल्यामुळे तृष्णातृप्ती झाल्याच्या भावना शेतकरी, नागरिक व्यक्त करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version