देशात इंधन टंचाई नाही; विदर्भ-मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ‘मेंढीवळणा’मुळे टंचाईसदृश स्थिती; केवळ अफवांमुळे खरेदीसाठी झुंबड!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

पेट्रोल ८७, तर डिझेल ९१ पैशांनी महागले; अफवा आणि ‘पॅनिक बायिंग’मुळे गोंधळ!

मुंबई/नवी दिल्ली (आवेश तिवारी/बाळू वानखेडे) : देशात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर आहे, अशी ग्वाही केंद्र सरकार आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ झाली असली, तरी देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सोशल मीडियावरील अफवांमुळे काही भागांत ग्राहकांनी इंधन खरेदीसाठी गर्दी केल्याने तात्पुरती टंचाई भासत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, विदर्भातील बुलढाणा, वाशीम व नजीकच्या हिंगोली, परभणी आदी जिल्ह्यांत सध्या शेतीकामांच्या (नांगरणीच्या) हंगामामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. त्यातच टंचाईच्या अफवा पसरल्याने शेतकरी डिझेल खरेदीसाठी गर्दी करत असून, सध्या नांगरणी सुरू असल्याने ड्रम अथवा कॅनमध्ये डिझेल साठवून ठेवत आहेत. त्यामुळे केवळ अफवा आणि अतिरिक्त साठवणुकीमुळेच इंधन खरेदीसाठी गर्दी उसळत असल्याचे चित्र आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसरी वाढ

शनिवारी देशभरात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८७ पैसे, तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची वाढ करण्यात आली. चालू महिन्यातील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ९८.६४ रुपयांवरून ९९.५१ रुपये झाले आहे, तर डिझेल ९१.५८ रुपयांवरून ९२.४९ रुपयांवर पोहोचले आहे. या दरवाढीचा थेट फटका वाहतूकदार, नोकरदार आणि सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे.

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावरून इंधन टंचाईच्या अफवा पसरल्याने विदर्भ व मराठवाड्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. काही पेट्रोल पंपांवरील दैनंदिन मागणी अचानक ४ ते ५ पटीने वाढली. परिणामी, टँकर्सद्वारे नवीन साठा येईपर्यंत काही काळ इंधन संपल्याचे चित्र निर्माण झाले.

इंडियन ऑईलने (IOC) दिलेल्या माहितीनुसार, १ ते २२ मे दरम्यान या भागात पेट्रोलच्या विक्रीत १४ टक्के, तर डिझेलच्या विक्रीत तब्बल १८ टक्क्यांची अभूतपूर्व वाढ झाली आहे. ही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी तेल कंपन्यांचे डेपो अतिरिक्त वेळ काम करत असून, पुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. कोणत्याही सरकारी तेल कंपनीला इंधन रेशनिंग (मर्यादित पुरवठा) करण्याचे आदेश दिलेले नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

खासगी विरुद्ध सरकारी पंप: ग्राहकांचा ओढा बदलला!

पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे खासगी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांनी आपल्या दरांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपला मोर्चा सरकारी कंपन्यांच्या (आयओसी, बीपीसीएल, एचपीसीएल) पंपांकडे वळवला आहे. ग्राहकांच्या या अचानक बदललेल्या खरेदी पद्धतीमुळे सरकारी पंपांवर तात्पुरता ताण निर्माण झाला आहे.

देशाकडे ६० दिवसांचा राखीव साठा

भारताची इंधन सुरक्षा पूर्णपणे मजबूत आहे. सद्यस्थितीत देशाकडे पुढील ६० दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा (Crude Oil) साठा उपलब्ध आहे. याशिवाय, शुद्ध केलेले पेट्रोल आणि डिझेलचा २५ ते ३० दिवसांचा अतिरिक्त बफर स्टॉक देखील कंपन्यांकडे तयार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून बेकायदेशीर डब्यांमध्ये किंवा कॅनमध्ये इंधनाचा साठा करू नये, असे आवाहन ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने (PIB) केले आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचं…

  1. तुटवडा नाही: देशात इंधनाचा तुटवडा नाही; काही पंपांवरील रांगा या केवळ अफवांमुळे आणि हंगामी मागणीमुळे झालेल्या गर्दीमुळे आहेत.
  2. तिसरी दरवाढ: १० दिवसांत तिसऱ्यांदा इंधन महागले; पेट्रोल ८७ पैसे तर डिझेल ९१ पैशांनी महाग.
  3. आयात अवलंबित्व: भारत आपल्या गरजेच्या ८५% कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे जागतिक घडामोडींचा दरांवर थेट परिणाम होतो.
Share This Article
Exit mobile version