– साखरखेर्डा येथे ठाणेदारांना निवेदन; २४ तासांत अटकेची आणि ‘पत्रकार संरक्षण कायद्या’ची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड-राहेरी रेती घाटावरील अवैध उत्खननाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले ज्येष्ठ पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर वाळूमाफियांनी गुंडांच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले असून, साखरखेर्डा येथील पत्रकार संघटनांच्यावतीने या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणी दोषींवर २४ तासांत कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
राहेरी घाटावर सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीविरोधात स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. या आंदोलनाचे वृत्त संकलन करण्यासाठी पत्रकार रामदास कहाळे गेले असता, तेथील वाळू माफियांनी त्यांना लक्ष करत अमानुष मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ विविध पत्रकार संघटनांच्यावतीने साखरखेर्डा येथील ठाणेदार गजानन करेवाड यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. हल्लेखोर आणि त्यांच्या सूत्रधारांना तात्काळ अटक करावी, आरोपींवर ‘महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) कायदा’ (पत्रकार संरक्षण कायदा) व इतर अजामीनपात्र कलमांनुसार गुन्हे दाखल करावेत, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून निर्भीडपणे काम करण्यासाठी पत्रकारांना योग्य संरक्षण मिळावे. समाजकंटकांकडून पत्रकारांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल पत्रकार वर्तुळातून तीव्र चिंता व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन २४ तासांत ठोस कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे प्रा. दिलीप नाईकवाड, माजी प्राचार्य डी. एन. पाचाळ, अ.भा. ग्रामीण पत्रकार संघटनेचे विदर्भ प्रमुख प्रतापराव मोरे, जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे, सचिव सचिन खंडारे, प्रसिद्धी प्रमुख प्रल्हाद देशमुख, तालुकाध्यक्ष समाधान सरकटे, समाधान म्हस्के, पवन मगर, जुबेर शहा, विजय देशमुख, डॉ. गंगाराम उबाळे यांच्यासह साखरखेर्डा व परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

