आळंदीत विशेष स्वच्छता अभियान; इंद्रायणी नदी पात्रातील कचरा बाहेर काढण्यात आला

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सेवाभावी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; शेकडो भक्तांच्या उपस्थितीत भव्य स्वच्छता मोहीम

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील इंद्रायणी नदी पात्रातील वाढते घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला. नाणिज येथील मठातील सद्गुरू नरेंद्र महाराज यांचे भक्त, शिष्य परिवार व संप्रदाय यांच्या विशेष पुढाकारातून तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी भव्य दिव्य स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.

या अभियानात विविध सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देत शेकडो भक्तांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अधिक मासाच्या धार्मिक पर्वणीच्या काळात सेवाकार्य करण्याची संधी मिळाल्याचे समाधान सहभागी सेवकांनी व्यक्त केले. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वाद व मार्गदर्शनातून या स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माऊलींच्या प्रतिमेचे तसेच नदी पूजन करण्यात आले. या अभियानात मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतून चार हजारांहून अधिक भाविक व सेवक सहभागी झाले होते. महिलांचाही लक्षणीय सहभाग यामध्ये पाहायला मिळाला. नदी पात्रातून कचरा, कपडे, जलपर्णी, लाकडी वस्तू, पुरामुळे वाहून आलेली झाडे-झुडपे, काचा, निर्माल्य तसेच अस्थी विसर्जनानंतर सोडण्यात आलेल्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या. संकलित केलेला कचरा पुढील विल्हेवाटीसाठी आळंदी नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्यात आला. या उपक्रमामुळे नगरपरिषदेच्या स्वच्छता कार्याला एकप्रकारे बळ मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या अभियानास महापौर रवी लांडगे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे कबीर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांसह मान्यवर उपस्थित होते. सेवा कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आळंदी नगरपरिषदेने आरोग्य विभागाची यंत्रणा व साधने उपलब्ध करून देत या स्वच्छता मोहिमेस सहकार्य केले. अखिल भारतीय संग्राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मानकर, सिद्धेश्वर कोळी, लेफ्टनंट जनरल पश्चिम महाराष्ट्र गणेश सस्ते आदींचा विशेष सहभाग राहिला. सायंकाळी इंद्रायणी नदी घाटावर दीपदान करून परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण घाट परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला.

Share This Article
Exit mobile version