-शेतकरी व नागरिकांना प्राधान्याने इंधन पुरवठ्याचे तहसील प्रशासनाचे निर्देश
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : तालुक्यात पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रवीण देव्हरे यांच्या आदेशानुसार तहसीलदार अजित दिवटे यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देणारे पत्र काढले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महसूल व पोलीस प्रशासन संयुक्तपणे सक्रिय झाले असून, तालुक्यात कृत्रिम इंधन टंचाई निर्माण होऊ नये यासाठी विशेष नियंत्रण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पेट्रोल पंपांवर वाढती गर्दी आणि संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर महसूल विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पथकांकडून इंधन वितरण प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवले जाणार असून, साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना प्राधान्याने इंधन वितरण
बुलढाणा जिल्हा कृषीप्रधान असल्याने सध्या शेतीकामांना वेग आला आहे. ट्रॅक्टर, पाण्याचे पंप आणि कृषी यंत्रसामग्रीसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत इंधन उपलब्ध व्हावे आणि शेतीकामात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही सुरळीत इंधन पुरवठा करण्यावर भर देण्यात आला आहे.
‘नो स्टॉक’च्या खोट्या फलकांवर कठोर कारवाई
तहसीलदार अजित दिवटे यांनी पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, खोटे “नो स्टॉक” फलक लावून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. इंधन साठ्याची नियमित तपासणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंप चालकांवर परवाना रद्द करण्याची कारवाईही होऊ शकते. अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
सोशल मीडियावर अफवा पसरवून भीती निर्माण करणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पेट्रोल पंपांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अचानक तपासण्या व दैनंदिन अहवाल व्यवस्था
तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर अचानक तपासण्या करण्यात येणार असून, इंधन वितरणाची स्थिती व कायदा-सुव्यवस्थेचा आढावा दररोज घेतला जाणार आहे. महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकांकडून दैनंदिन अहवाल सादर केला जाणार आहे. तहसीलदार अजित दिवटे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत तालुक्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

