– ‘ट्रॅक्टर काय पाण्यावर चालतात का?’ सुस्त प्रशासनाला शेतकऱ्यांचा संतप्त सवाल; दोन दिवसांत डिझेल न मिळाल्यास शेतकरी आंदोलन पेटणार!
– शेतकऱ्यांनी शेतात राबायचं की डिझेलसाठी रांगेत मरायचं? मेरा चौकीत बळीराजाची रणगर्जना!
चिखली (अंकुश पाटील) : शेतमालाला रास्त भाव नाही आणि आता हक्काचं डिझेलही मिळेना! सरकारच्या नाकर्तेपणामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजा देशोधडीला लागला असून, आज या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांच्या संतापाचा ज्वालामुखी मेरा चौकी येथे फाटला. “शेतकऱ्यांनी शेतात कामं करायची की डिझेलसाठी रांगेत मरायचं?” असा संतप्त सवाल करत शेतकरी संघटनेने मेरा चौकी येथे तब्बल तासभर रस्ता रोको आंदोलन केले. सरकारच्या ढिम्म प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी संपूर्ण रस्ता जाम केला होता.
आधीच इशारा दिला होता, पण सरकार सुस्त!
या डिझेल टंचाईबाबत शेतकरी संघटनेने आठ दिवसांपूर्वीच तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन जागे करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. अखेर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि आज मेरा चौकीत उद्रेक झाला.
या आक्रमक रास्ता रोको आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश पाटील थुट्टे, विनोद पाटील थुट्टे, भागवत पाटील थुट्टे, शरद पाटील थुट्टे, विशाल पाटील थुट्टे, संदीप पाटील थुट्टे, श्रीकृष्ण पाटील थुट्टे, समाधान थुट्टे, दीपक गाडेकर, पवन शेटे, अंकुश देशमुख, आकाश पैठणे, गणेश मधुकर थुट्टे यांच्यासह शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
दोन दिवसांत डिझेल द्या, नाहीतर गाठ आमच्याशी आहे!
आंदोलनाची तीव्रता पाहून अंडेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रूपेश शंक्करगे आणि तहसीलदार गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. “आम्ही शासन दरबारी मागणी करून तुमचे प्रश्न तात्काळ मार्गी लावू,” असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तूर्त मागे घेतले.
परंतु, शेतकरी नेत्यांनी प्रशासनाला थेट आणि कडक इशारा दिला आहे की, “येत्या दोन दिवसांत जर डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले नाही, तर यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र आणि हिंसक होईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल!”

