‘महायुती’तील अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिखलीत राष्ट्रवादीची ‘समन्वय’ भूमिका!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– मित्रपक्षांशी सुसंवाद साधत विकासाचा मार्ग स्वीकारणार; तालुका बैठकीत संतोष परीहार यांचे प्रतिपादन

चिखली ग्रामीण (तालुका प्रतिनिधी) – राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) मोठे योगदान राहिले आहे. आगामी काळात चिखली तालुक्यात मित्रपक्षांशी कोणताही संघर्ष न करता, त्यांच्याशी योग्य समन्वय साधूनच लोकहिताची आणि विकासाभिमुख कामे पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे चिखली तालुकाध्यक्ष संतोष परीहार यांनी केले. चिखली आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सध्या सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि स्थानिक वर्चस्वावरून राजकीय स्पर्धा तीव्र झाली असताना, परीहार यांनी मांडलेली ‘समन्वयाची’ भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

स्थानिक स्वरांजली हॉटेल येथे शुक्रवारी (२२ मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिखली तालुका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करणे, बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करणे, ग्रामीण भागात शाखा विस्तार करणे आणि पक्षाची राजकीय रणनीती ठरवणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी लवकरच एक भव्य तालुकास्तरीय मेळावा घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष मनोज दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष विजय अंभोरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ खरात, युवा नेते शेखर बोंद्रे, रुपेश रिंढे, रुपेश गवई, उमेश राठोड, सुनील सुरडकर, विलास वसु, राजेंद्र सुरडकर, प्रशांत जिने, विशाल थुट्टे यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चिखली आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये (भाजप, शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट) अंतर्गत चढाओढ सुरू आहे. अशा संवेदनशील राजकीय वातावरणात संघर्षाची भूमिका न घेता “विकास आणि लोकहित” हाच मुख्य अजेंडा ठेवल्याचा सकारात्मक संदेश राष्ट्रवादीने या बैठकीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. गावपातळीवर पक्ष वाढवताना मित्रपक्षांना दुखावले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे संकेत यातून मिळतात.

Share This Article
Exit mobile version