ग्रामीण महाराष्ट्रात इंधनाचा तीव्र तुटवडा; पिंप्राळा फाटा येथे डिझेलसाठी तलवारी, कोयते उपसले!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

विदर्भ-मराठवाड्यात तणाव कायम | शेतकरी अडचणीत | सरकारचे दावे आणि प्रत्यक्षातील भीषण परिस्थितीत तफावत!

छत्रपती संभाजीनगर (हरि मुंढे) – राज्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे दावे सरकारकडून केले जात असले, तरी प्रत्यक्षात ग्रामीण महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागांत पेट्रोल-डिझेलसाठी अक्षरशः दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, खामगाव तालुक्यातील पिंप्राळा फाटा येथे तर इंधनासाठी थेट तलवारी आणि कोयते उपसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय, खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला असून, कृषी कामांना मोठा ब्रेक लागला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंप्राळा फाटा येथील पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री चार जणांनी हातात तलवारी आणि कोयते घेऊन दहशत माजवली. पंपावरील कर्मचाऱ्याने ‘इमर्जन्सी स्टॉक’ असल्याने कॅनमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने संशयितांनी कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यासोबतच शेगाव आणि लोणार येथील पेट्रोल पंपांवरही इंधनासाठी प्रचंड रेटारेटी आणि हाणामारीच्या घटना घडल्या असून, याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहेत.

सध्या संपूर्ण मराठवाड्यात डिझेलचा अभूतपूर्व तुटवडा जाणवत आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यात तर काही पंपचालकांनी डिझेल देण्यासाठी शेतकऱ्यांकडे थेट ‘सात-बारा’ उताऱ्याची मागणी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राजकीय प्रतिक्रिया आणि आंदोलने

  • ‘मेलोडी’ चॉकलेट वाटून अनोखा निषेध: मलकापूर येथे पेट्रोल पंपावर लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सैनिकांनी सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. वाहनधारकांना ‘मेलोडी’ चॉकलेटचे वाटप करत, “पेट्रोल-डिझेलची टंचाई आहे, मेलोडी खा आणि तोंड गोड करा,” असा टोला शिवसैनिकांनी सरकारला लगावला.
  • कृत्रिम टंचाईचा दावा फेटाळला – छगन भुजबळ: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात केवळ एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा असल्याचे सांगत यू-टर्न घेतला आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे अचानक विक्री वाढल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, विरोधकांचा कृत्रिम टंचाईचा दावा त्यांनी फेटाळला आहे.
  • घाबरून साठेबाजी करू नका – मुख्यमंत्री:  “राज्यात काही ठिकाणी तणावाची परिस्थिती असली तरी सर्वदूर अशी स्थिती नाही. एकाद-दुसरी घडणारी घटना ओघाने दाखवली जाते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाची साठेबाजी करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

खरीप हंगाम तोंडावर असताना डिझेलची टंचाई निर्माण होणे हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरत आहे. केवळ मालवाहतूकच नव्हे, तर शेतकऱ्यांची दैनंदिन वाहतूकही खोळंबली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचे कारण पुढे केले जात असले, तरी ऐन शेतीच्या हंगामात वितरणातील त्रुटींमुळे प्रशासकीय नियोजनावरील प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे. रिझर्व्ह बँकेनेही आधीच इशारा दिल्याप्रमाणे, जर युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली तर देशात महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share This Article
Exit mobile version