– NTA कडून तज्ज्ञ म्हणून नियुक्ती; मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात, एकूण अटक ११ वर!
नवी दिल्ली / पुणे (सोनाली बडगुजर) : देशभर खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-युजी’ (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून आणखी एका महिला मास्टरमाईंडला बेड्या ठोकल्या आहेत. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, तिने भौतिकशास्त्राचे (Physics) प्रश्न लीक केल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरव्यवहारात आतापर्यंत ‘मनीषा’ नावाच्या तीन वेगवेगळ्या महिलांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ३ मे रोजी नीट-युजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीचे कडेकोट पुरावे समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली असून, आता २१ जून रोजी ती पुन्हा घेतली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यापासून देशभरात वेगवान हालचाली सुरू आहेत. सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून एकूण ११ जणांना अटक केली आहे. मनीषा हवालदार ही या मालिकेतील ११ वी अटक आहे.
देशभरात छापेमारी, दलालांचे नेटवर्क उध्वस्त
सीबीआयने या प्रकरणात संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. या साहित्याच्या फॉरेन्सिक विश्लेषणातून प्रश्नपत्रिका लीक होण्याचा मुख्य स्रोत (Source) शोधण्यात यंत्रणेला यश आले आहे. लाखो रुपयांची लाच घेऊन विद्यार्थ्यांना विशेष कोचिंग क्लासेसमध्ये हे प्रश्न पुरवणाऱ्या दलालांचे नेटवर्क आता सीबीआयच्या रडारवर आले आहे.
NEET घोटाळा: कोणाला, कोठे झाली अटक?
सीबीआयने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
| आरोपीचे नाव | सध्याची स्थिती / कोठडी |
| महाराष्ट्रातील अटक: | |
| १. मनीषा संजय हवालदार | सीबीआय अटक (पुणे) |
| २. शिवराज मोटेगावकर | सीबीआय कोठडी |
| ३. प्रल्हाद कुलकर्णी | सीबीआय कोठडी |
| ४. मनीषा मांढरे | सीबीआय कोठडी |
| ५. मनीषा वाघमारे | सीबीआय कोठडी |
| ६. शुभम खैरनार | सीबीआय कोठडी |
| ७. धनंजय लोखंडे | न्यायालयीन कोठडी |
| इतर राज्यांतील अटक: | |
| ८. दिनेश बिवाल | न्यायालयीन कोठडी |
| ९. मांगीलाल बिवाल | न्यायालयीन कोठडी |
| १०. विकास बिवाल | न्यायालयीन कोठडी |
| ११. यश यादव | न्यायालयीन कोठडी |
या प्रकरणात आणखी काही मोठे मासे सीबीआयच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात असून, पुणे आणि लातूर कनेक्शनमुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

