– ४५ अंश तापमानात शेतकरी रांगेत; सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप
– कृत्रिम टंचाई की साठेबाजी? ग्राहकांचा संतप्त सवाल
बुलढाणा (बाळू वानखेडे) : राज्यात एकीकडे मान्सूनपूर्व कामांची लगबग सुरू असतानाच, बुलढाणा जिल्ह्यात मात्र गेल्या सहा दिवसांपासून इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील घाटावर आणि घाटाखालील बहुतांश तालुक्यांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, जिल्ह्यातील एकूण १६६ पेट्रोल पंपांपैकी केवळ २२ पंपांवरच सध्या डिझेल उपलब्ध आहे. निम्म्याहून अधिक पंपांना गेल्या तीन दिवसांपासून कुलूप लागले आहे, तर उर्वरित पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक झळकत आहेत. चालू हंगामातील शेती मशागतीची कामे ऐन रंगात आली असतानाच डिझेल गायब झाल्याने ट्रॅक्टर व इतर यंत्रे जागेवरच उभी आहेत. यामुळे देशाचा कणा असलेला शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला असून, ऑटो व्यवसायालाही याचा मोठा फटका बसला आहे.
एकीकडे, जिल्हा पुरवठा विभाग जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे नागरिकांना अतिरिक्त साठा न करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी आणि त्यानंतर लगेच ‘पेट्रोल-डिझेल संपले’चे फलक झळकत आहेत. त्यामुळे “प्रशासनाचा दावा खरा की पंपांवरील फलक?” असा यक्ष प्रश्न सध्या नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक तेवढे इंधन उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री, नामदार मकरंद पाटील यांनी दिली आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी इंधनाची साठेबाजी करू नये, तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नामदार मकरंद पाटील यांनी केले आहे.
सध्या उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला असून, या कडक उन्हात तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या ग्राहकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. तीन ते चार तास उन्हात उभे राहिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक प्रशासनाच्या तोंडी सूचनेनुसार केवळ दोन हजार रुपयांचेच डिझेल दिले जात आहे. प्रशासन शासकीय कर्मचाऱ्यांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य देत असताना, मशागतीच्या कामात व्यग्र असलेल्या शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यातच काही पंप चालक सर्वसामान्यांना डावलून केवळ ओळखीच्या व्यक्तींनाच इंधन देत असल्याने पंपांवर वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत.
इंधनाच्या टंचाईमुळे नागरिकांमधील संयम सुटत चालला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील पेट्रोल पंपावर काल रात्री इंधन भरण्यासाठी आलेल्या एका इसमाला काही दुचाकीस्वार गुंडांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, यावेळी घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर असतानाही हा राडा झाला, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऐन पेरणीच्या तोंडावर निर्माण झालेल्या या चक्रव्यूहातून प्रशासनाने तात्काळ मार्ग काढावा आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यांनाही इंधन पुरवठ्यात प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हवालदिल झालेला शेतकरी आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे आशेने पाहत आहे.
दरम्यान, आजरोजी जिल्ह्यात इंधनाचा समाधानकारक साठा उपलब्ध असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत आहे. आज, 21 मे रोजी विविध ऑईल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात इंधनाचा पुरवठा झाला आहे. त्यात, BPCL: 1 लाख 2 हजार 500 लिटर पेट्रोल आणि 3 लाख 5 हजार 500 लिटर डिझेल. HPCL: 1 लाख 5 हजार लिटर पेट्रोल आणि 3 लाख 74 हजार लिटर डिझेल. IOCL: 6 लाख 80 हजार लिटर पेट्रोल आणि 7 लाख 25 हजार लिटर डिझेल.

