-इंधन टंचाईमुळे शेतकरी व वाहनधारकांची गैरसोय, पंपांवर तणावपूर्ण परिस्थिती
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गेल्या काही दिवसांपासून देशभरात इंधन टंचाईची स्थिती निर्माण झाली असून याचा सर्वाधिक फटका शेतीकाम करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांना बसत आहे. साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी ड्रम व कॅनमधून इंधन भरण्याचाही प्रकार दिसून आला.

इंधन टंचाईमुळे शेतीची कामेही रखडली असून रब्बी हंगामातील काढणीनंतर आता मशागतीची कामे सुरू आहेत. नांगरणी, वखरणी यांसारखी कामे वेळेत होण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरचालकांवर अवलंबून आहेत. मात्र डिझेलअभावी कामे थांबल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. काही ट्रॅक्टरचालक “डिझेल द्या, बाकी पैसे नंतर” अशा अटीवर काम करत असल्याने पंपांवर कॅन व ड्रमची गर्दी वाढत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लागलेल्या रांगेत ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मोहाडी येथील सरपंच बबन काळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही, असा आरोपही करण्यात येत आहे.
साखरखेर्डा व मलकापूर-पांग्रा परिसरात अशा घटनांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पेट्रोल पंप चालक अरविंद बेंदाडे व रवींद्र पाटील यांनी सांगितले की, “काल रात्रीपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. इंधन आवक कमी असल्याने सर्वांना पुरवठा करणे कठीण होत आहे. उपलब्धतेनुसार प्रत्येकाला डिझेल व पेट्रोल देण्याचा प्रयत्न केला जात आहे.” सध्या परिसरातील पेट्रोल पंपांवर तणावपूर्ण परिस्थिती असून इंधन मिळवण्यासाठी वाहनधारकांची मोठी झुंबड उडत आहे.

