– गोपनीय माहिती ठरली अचूक; चिखलीत काळमेघ फर्निचरवर वनविभागाची धाड
– अडीच लाखांचे गोल व कट साईज लाकूड शासकीय आगारात जमा; पुढील तपास सुरू!
चिखली (महेंद्र हिवाळे) : येथील एका फर्निचर कारखान्यात विनापरवाना व बेकायदेशीरपणे मौल्यवान सागवान लाकडाची कटाई होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाच्या फिरत्या पथकाने सोमवारी (१८ मे) चिखली-खामगाव रस्त्यावरील एका फर्निचर मार्टवर धाड टाकून तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली-खामगाव मार्गावरील ‘काळमेघ फर्निचर’ येथे विनापास आणि कोणत्याही वैध परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणावर सागवान लाकडाची कटाई आणि साठवणूक केली जात असल्याची गोपनीय माहिती बुलढाण्याचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या नेतृत्वात एक विशेष चमू तयार करण्यात आली. या चमूने काळमेघ फर्निचरवर अचानक छापा टाकला. या कारवाईत कोणताही वैध पास नसलेला अडीच लाख रुपये किमतीचा सागवान लाकडाचा गोल साठा व कट साईज लाकूड आढळून आले. वनविभागाने हे लाकूड आणि गुन्ह्यात वापरलेली २५ हजार रुपये किमतीची रंधा मशीन, असा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेले लाकूड बुलढाणा येथील शासकीय लाकूड आगारात (डेपो) जमा करण्यात आले आहे.
ही कामगिरी अमरावती वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षक श्रीमती ज्योती बॅनर्जी, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) श्री. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ, वनपाल श्रीनाथ, वनरक्षक माने, पोलीस कर्मचारी काकड, वाहनचालक विकास किलबिले, तसेच बुलढाणा प्रादेशिक परिक्षेत्रातील वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक समाधान झोटे, गजानन शिंदे, नितेश गवई, गजानन पोटे आणि वनमजूर रवींद्र तायडे, पवन मुळे, दीपक सोनवणे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
या बेकायदेशीर लाकूड साठ्याप्रकरणी वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास बुलढाणा प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध वनविभाग घेत आहे.

