‘एमआयटी एडीटी’च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील सर्वात मोठ्या आरसी इलेक्ट्रिक विमानाची निर्मिती

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पुणे (अर्जुन मेदणकर) : भारतीय विद्यार्थी संशोधन आणि एरोस्पेस नवोन्मेष क्षेत्रात ऐतिहासिक ठरणारी कामगिरी करत ‘एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील सर्वात मोठे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या डिझाईन, विकसित आणि उड्डाण केले आहे. ‘टीम स्कायट्रेक’ने विकसित केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट गरुडा’ असे नाव देण्यात आले आहे.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्स अंतर्गत एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी हे विमान पूर्णपणे स्वतः विकसित केले असून, या प्रकल्पासाठी ‘सेंटर फॉर रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप फॉर यंग अॅस्पिरंट्स’ (CRIEYA) मार्फत विद्यापीठाने अर्थसहाय्य केले आहे. ९.२५ मीटर एवढ्या विशाल विंगस्पॅनसह आणि २६१ किलो वजन असलेले हे विमान भारतात तयार झालेले सर्वात मोठे आणि सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमान ठरले आहे. या प्रकल्पासाठी ‘CRIEYA’कडून तब्बल ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यशस्वी उड्डाणानंतर या विमानाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये भारतातील सर्वाधिक वजनाचे आरसी विमान तसेच सर्वात मोठ्या विंगस्पॅनचे आरसी विमान म्हणून नोंद करण्यात आली आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ‘इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या अधिकाऱ्यांकडून ‘प्रोजेक्ट गरुडा’ला विक्रमाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. पूर्णपणे विद्यार्थ्यांनी विकसित केलेला हा प्रकल्प अनुभवाधारित शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थी-केंद्रित नवोन्मेषाचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.

या प्रकल्पाला विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांचे सहकार्य लाभले. अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, एरोस्पेस विभागप्रमुख डॉ. कमलेश कुलकर्णी, डॉ. सुनील डिंगरे तसेच CRIEYAचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष दराडे यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विमानाची रचना, स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन, एरोडायनॅमिक्स विश्लेषण, फ्लाइट कंट्रोलर प्रणाली, आरटीके-जीपीएस नेव्हिगेशन, इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीम, फ्लाइट टेस्टिंग आणि रिमोट पायलटिंग यासह सर्व तांत्रिक कामे स्वतंत्रपणे पूर्ण केली. प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले की, “प्रोजेक्ट गरुडा हे अनुभवाधारित आणि नवोन्मेषप्रधान शिक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन, चिकाटी आणि संघभावनेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवरील एरोस्पेस क्षेत्रात मोठी कामगिरी साध्य केली आहे.”

या प्रकल्पाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक आणि कार्यात्मक अडचणींचा सामना करावा लागला. २०२४ मधील प्रारंभीच्या चाचण्या अपयशी ठरल्यानंतरही विद्यार्थ्यांनी विमानात सातत्याने सुधारणा केल्या. अखेर ४ मे २०२६ रोजी धुळे येथील धावपट्टीवर या विमानाने यशस्वी टेक-ऑफ, नियंत्रित उड्डाण आणि सुरक्षित लँडिंग करत भारतीय विद्यार्थी-नेतृत्वाखालील एरोस्पेस संशोधनात नवा विक्रम प्रस्थापित केला. या प्रकल्पासाठी ‘CRIEYA’ने तीन टप्प्यांत ४८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या सहाय्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोटोटाइप विकसित करणे, प्रोपल्शन सिस्टीममध्ये सुधारणा, स्ट्रक्चरल मजबुतीकरण आणि कंट्रोल सिस्टीम अधिक सक्षम करण्यास मदत झाली.

भविष्यात ‘टीम स्कायट्रेक’ ई-व्हीटॉल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी, स्वॉर्म-ड्रोन सिस्टीमसाठी मदरशिप प्लॅटफॉर्म तसेच संरक्षण आणि नागरी वापरासाठी प्रगत यूएव्ही संशोधन व्यासपीठ विकसित करण्याच्या दिशेने काम करणार असल्याची माहिती देण्यात आली. ‘गरुडा’ विमानाची वैशिष्ट्येही लक्षवेधी आहेत. या विमानाचे वजन २६१ किलो असून विंगस्पॅन ९.२५ मीटर आहे. टेक-ऑफसाठी २०० मीटर अंतर आवश्यक असून कमाल वेग ८० किलोमीटर प्रतितास आहे. विमानाची पेलोड क्षमता १०० किलोपर्यंत असून ते १०० मीटर उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. १०० व्होल्टच्या लि-पो २२० एएच बॅटरीवर चालणाऱ्या या विमानाची उड्डाण क्षमता सुमारे १० मिनिटांची आहे.

Share This Article
Exit mobile version