बुलढाणा येथे राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव; विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी परिचय मेळाव्याचेही आयोजन

चिखली (प्रतिनिधी) : संजिवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था, केळवद ता. चिखली जि. बुलढाणा यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ६ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सामाजिक न्याय विभाग सभागृह, बुलढाणा येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार शिवश्री रेखाताई खेडेकर, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, खासदार तथा आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले पाटील यांच्यासह महाराष्ट्र शासनातील विविध विभागांचे अधिकारी आणि इतर मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा फोटो असे असणार आहे.

यामध्ये कवी, लेखक, पत्रकार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, कृषी सहाय्यक, तलाठी, प्राचार्य, शिक्षक-शिक्षिका तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी परिचय मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले असून बुलढाणा जिल्ह्यातील संबंधित महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकल महिला नारी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. उज्वला निवृत्ती राजे जाधव यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू असून अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक संजिवनी राजे जाधव यांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version