-इथेनॉल व बायोडिझेलचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी; तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा
चिखली (महेंद्र हिवाळे) : खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यात खतांसह डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतीच्या मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. वेळेवर डिझेल उपलब्ध न झाल्यास यंदा शेती पेरणार नसल्याचा इशारा जिल्हा शेतकरी संघटनेने दिला आहे. या मागण्यांसाठी सोमवारी (दि. १८ मे) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष देवीदास किसनराव कणखर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हातात डिझेलचे कॅन घेऊन आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांत्रिक शेतीला प्रोत्साहन दिल्यानंतर ट्रॅक्टर व कृषी यंत्रांचा वापर वाढला असून त्यामुळे पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्वही वाढल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यात डिझेलसाठी शेतकऱ्यांना पेट्रोलपंपांवर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून अनेक ठिकाणी कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात आहे. ट्रॅक्टर थेट पेट्रोलपंपावर आणणे अनेक शेतकऱ्यांसाठी अवघड ठरत असल्याने कॅनमध्ये डिझेल देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
पूर्वी बैलांच्या साहाय्याने शेती केली जात होती, त्यामुळे इंधनावरील अवलंबित्व कमी होते. मात्र आता आधुनिक यांत्रिक शेतीमुळे इंधनाशिवाय शेती करणे अशक्य बनले आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल आणि बायोडिझेल उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. देशात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ऊस उत्पादनातून इथेनॉल तयार होऊ शकते, तर इतर जैविक स्रोतांपासून बायोडिझेल निर्मिती शक्य असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना कमी दरात पर्यायी इंधन उपलब्ध झाल्यास शेतीचा खर्च कमी होईल आणि परदेशातून होणारी इंधन आयातही कमी होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
शासनाने नैसर्गिक शेतीसोबतच पर्यावरणपूरक यांत्रिक शेतीलाही चालना द्यावी, इथेनॉल, बायोगॅस आणि बायोडिझेल वापरासाठी विशेष योजना राबवाव्यात तसेच रासायनिक खतांप्रमाणे इंधनावरही अनुदानाचा विचार करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अन्यथा वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट आणखी तीव्र होईल, असा इशाराही संघटनेने दिला. या मोर्चात देवीदास कणखर, एकनाथ पाटील, भीका पाटील, खुशालराव पाटील, अच्युतराव पाटील, गणेश थुट्टे, मुरलीधर येवले, दिनकर घुबे, राजू शेटे, प्रकाश घुबे, भागवत थुट्टे, गजानन घुबे, दीपक घुबे, परमेश्वर घुबे, रामेश्वर अंभोरे, भागवत नरवाडे, आत्माराम गाडे, संतोष शेळके, रामदास शेळके, श्रीधर थुट्टे, शरद थुट्टे, संदीप थुट्टे, श्रीकृष्ण थुट्टे, सागर कव्हळे, संतोष शेरे, समाधान थुट्टे, केशव थुट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

